कोर्ट एक असं ठिकाण आहे जिथ भल्याभल्यांची बोलती बंद होते. जर गुन्हा सिद्ध झाला तर इथेच गुन्हेगाराच्या नशीबाचा निर्णय घेतला जातो. हुशारातील हुशार गुन्हेागारही इथे जाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनाच्या एका कोर्टात एका आरोपीने सुनावणी दरम्यान असं काही केलं की, सगळेच हैराण झाले. आरोपीच्या विचित्र वागण्यामुळे न्यायाधीशांनी त्याला कोर्टाबाहेर काढलं. आरोपीवर आपली आई आणि मावशीच्या हत्येचा आरोप लावण्यात आला होता. जेव्हा वकिलाने प्रश्न विचारले तरी आरोपीने प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर दिलं. आरोपी कोर्टात केवळ म्याऊं-म्याऊं करत राहिला.
वकिलाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्याऊं-म्याऊं असं दिल्याने न्यायाधीश चांगलेच संतापले. आधी तर त्यांनी आरोपीला व्यवस्थित उत्तर देण्याचा इशारा दिला. पण त्यानंतरही तो ऐकला नाही तेव्हा त्याला न्यायाधीशांनी कोर्टाबाहेर काढलं. ही घटना २६ ऑक्टोबरला अर्जेंटिनाच्या मेंडोजा शहरात घडली. आपल्या ट्रायल दरम्यान व्यक्तीने केवळ म्याऊं-म्याऊं इतकंच केलं. यामुळे लोक त्याला कॅट मॅन म्हणू लागले. या व्यक्तीचं नाव निकोलस गिल पेरेज आहे. तो मुळचा इस्त्राइलचा आहे. त्याने २०१९ मध्ये इस्त्राइलहून अर्जेंटिनाला आलेल्या आपल्या आईची आणि मावशीची हत्या केली होती.
२०१९ मध्ये निकोलसला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या घरात पोलिसांना अनेक मांजर सापडल्या. कस्टडीमध्ये त्याची स्थिती बघून पोलिसांनी त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. इथे त्याने त्याला मांजरींसोबत ठेवण्याची मागणी केली. पण हे मान्य केलं गेलं नाही. आता सुनावणी दरम्यान जेव्हा वकिलांनी त्याला कोणताही प्रश्न केला तेव्हा फक्त म्याऊं-म्याऊं असं उत्तर देत होता. त्यामुळे कोर्टातील लोक हसू लागले होते. थोड्या वेळाने न्यायाधीशांना राग आला आणि त्यांनी निकोलसला कोर्टाबाहेर काढलं.
लोकल मीडियानुसार आता निकोलसचे वकील कोर्टात त्याला मानसिक रोगी सिद्ध करून त्याला जामीन मिळवून देऊ शकतात. या अजब घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. यात लोक तो खरंच पागल असल्याचं म्हणत आहेत. तर काही लोक तो शिक्षेपासून वाचण्यासाठी पागल असल्याचा अभिनय करत असल्याचं म्हणाले.