एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करणं हे समाजामध्ये नामुष्कीजनक मानलं जातं. मात्र एका तरुणीच्याबाबतीत मात्र भलतंच घडलं आहे. पोलिसांनी तिच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर तिचं नशीब पालटलं असून, आता ती प्रसिद्ध होऊन भरपूर कमाई करत आहे. अमेरिकेतील जॉर्जिया येथे राहणारी ही तरुणी आता दर महिन्याला लाखोंची कमाई करत आहे. ती सांगते की, पोलिसांनी अटक केल्यानेच मी आज एवढी श्रीमंत झाले आहे. अमेरिकेमध्ये आरोपीला अटक केल्यावर पोलीस हातात हातकड्या घालून फोटो घेतात. असाच एक फोटो २८ वर्षीय एबी न्यूमेन हिचाही घेण्यात आला होता. तिचा हाच फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला.
पोलिसांनी अटक केल्यानंतर एबी चार दिवस कोठडीत होती. मद्याच्या नशेमध्ये तिने एका स्टोअरमध्ये चोरी केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. तुरुंगातून सुटल्यावर इन्स्टाग्रामवरील एका प्रसिद्ध अकाऊंटवरून तिचा फोटो शेअर करण्यात आल्याचे तिला समजले. या इन्स्टा पेजवरून सुंदर दिसणाऱ्या गुन्हेगारांचे फोटो पोस्ट केले जातात. जेव्हा लोकांनी एबीचे फोटो पाहिले तेव्हा त्यांनी तिला सोशल मीडियावर शोधण्यास सुरुवात केली. तिच्या अकाउंटमध्ये फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढत गेली. तिथूनच तिची बक्कळ कमाई होण्यास सुरुवात झाली. इथूनच त्यांना पैसा मिळू लागला. तिचे फॉलोअर्स एवढ्या वेगाने वाढले की तिला कुठलीही पोस्ट केली नाही तरी तिला पैसे मिळू लागले.
आता ती सांगते की, हे गमतीदार जीवन कसं काम करतं. अमेरिकेत कुठल्याही कारणानं तुम्ही सुंदर दिसत असाल आणि गुन्हेगार असाल तर तुम्ही पैसे कमावू शकता. माझं जीवन खूप चढउतारांनी भरलेलं आहे. मला लैंगिक शोषण आणि अमली पदार्थांच्या व्यसनाचा सामना करावा लागला. मला मानसिक आजारही झाले. मिी दरमहा पाच हजार डॉलर एवढी कमाई करू लागले होते. त्यामधून मी माझे घरखर्च भागवत होते.
याआधीही एबी हिला अटक करण्यात आळी होती. एप्रिल २०२३ मध्ये एका विमानात भांडण झाल्यानंतर ती सहा तास तुरुंगात राहिली होती. सप्टेंबर महिन्यात तिचा गर्भपात झाला होता. मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याने ती मद्याच्या आहारी गेली. नशेमध्ये तिने नोव्हेंबर महिन्यात चोरी केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली होती. मात्र या अटकेनंतर तिचं नशिबच पालटलं. पुढच्या डिसेंबर महिन्यात तिने सुमारे ९२ हजार डॉलर एवढी कमाई केली. आता तर ती मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.