अंतराळात अॅस्ट्रॉनोटबनून काम करणं हे जितकं कठिण तितकचं रोमांचकारी सुद्धा. मात्र तुमच्या-आमच्याप्रमाणे त्यांनाही कामाचा कंटाळा येतोच की. मग अशावेळी आपण जे करतो ते त्यांनीही केलं तर? म्हणजे आपण कशी विकेंडला मस्त पार्टी करतो तशी अंतराळवीरांनी अंतराळात करायची ठरवली तर काय धम्माल येईल? स्वत:च पाहा...
या अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पिझ्झा पार्टी केली, जे पृथ्वीपासून ४०० किमी पेक्षा जास्त अंतरावर आहे. त्यांनी त्याचा व्हिडिओही तयार केला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ थॉमस पेस्केटने (Thomas Pesquet) यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे.
जवळजवळ एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये थॉमस झिरो ग्रॅव्हिटीमध्ये आपल्या मित्रांसह पिझ्झाचा आनंद घेताना दिसत आहे. हे अंतराळवीर पिझ्झा बनवतही आहेत आणि खातही आहेत. ते तर उडत आहेतच पण ते तयार करत असलेला पिझ्झाही हवेत उडताना दिसतोय. हवेत पिझ्झा उडत असतानाच त्यावर वेगवेगळे टॉपिंग्ज लावून ते पार्टी करत आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ ७ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तसेच, व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
व्हिडिओसह, थॉमस यांनी कॅप्शनही पोस्ट केली की , 'मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट, हे चित्र पृथ्वीवरील शनिवार-रविवारी होणाऱ्या विकेण्ड पार्टीसारखे आहे. मात्र, असं म्हटलं जातं की, एक उत्तम शेफ कधीही त्याच्या रेसिपिज मधील खास चवीचे रहस्य उघड करत नाही, पण मी करतोय...'