मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. देशातील बहुतांश राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. बऱ्याच ठिकाणी प्रवासासाठी लसीकरणाची अट ठेवण्यात आली आहे. हवाई मार्गानं प्रवास करताना विमानतळावर प्रवाशांची लसीकरण प्रमाणपत्रं तपासली जात आहेत. त्यावर एका पठ्ठ्यानं उपाय शोधून काढला आहे.
स्टँड अप कॉमेडियन अतुल खत्रींनी ट्विटरवर त्यांचा एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. पांढऱ्या टी-शर्टमधील खत्रींचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. खत्रींनी परिधान केलेल्या टी-शर्टवर कोरोना प्रमाणपत्र प्रिंट करण्यात आलं आहे. 'काम आणि प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. विमानतळ, हॉटेलमध्ये वारंवार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवून कंटाळल्यानं ही आयडिया सुचली,' असं खत्रींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
लोकल प्रवासासाठी लसीकरण गरजेचंकोविड प्रतिबंधक लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांसाठी येत्या स्वातंत्र्य दिनापासून अर्थात १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच रात्री सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना केली.
सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी या मागणीचा रेटा वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल नागरिकांशी संवाद साधत कोविडसह विविध विषयांवर भाष्य केलं. कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही. अजूनही आपण दुसऱ्या लाटेतून पूर्णपणे सावरलेलो नाही. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोकाही आहे. मात्र तरीही अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.