ऑस्ट्रेलियातील एका कपलने चुकीने त्यांची साखरपुड्याची आणि लग्नाची अशा दोन्ही अंगठ्या कचऱ्यात फेकून दिल्या. आता अर्थातच दोघांचा जीव टांगणीला लागला असेल. जेव्हा त्यांना हे कळालं तेव्हा त्यांनी तब्बल ३० टन कचऱ्याने भरलेल्या ट्रकमध्ये अंगठ्या शोधल्या. या दोन्ही अंगठ्या हिऱ्याच्या होत्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलबर्नमध्ये राहणाऱ्या या कपलने घरातील काही काम काढलं होतं. शनिवारी जेव्हा त्यांनी घरातील सगळा मलबा एका ट्रकमधून डंपिंग यार्डला पाठवला, तेव्हा त्यात त्यांचा ज्वेलरी बॉक्सही गेला. झालं, रात्रभर कपलला या विचारानेच झोप आली नाही.
स्टोनिंगटन सिटी काउन्सिलचे प्रवक्ता जिम कार्डन यांनी सांगितले की, 'कपलने घराच्या रिनोव्हेशननंतर कचरा उचलण्यासाठी बोलवले होते. आमची टीम गेली आणि त्यांनी कचरा कलेक्शनमध्ये आणला. नंतर कपलच्या लक्षात आलं की, ज्वेलरी बॉक्स चुकून कचऱ्यात गेलाय. ज्यात दोन अंगठ्या होत्या'. नंतर जेव्हा कपलने फोन केला तेव्हा सेंटर बंद झालं होतं. सकाळी जिमने कपलला बोलवलं.
जिमने सांगितले की, 'कपल सकाळी ४ वाजताच कलेक्शन सेंटरमध्ये पोहोचलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये ज्वेलरी बॉक्सचा शोध सुरू केला. ट्रकमध्ये ३० टन कचरा होता. त्यामुळे अंगठ्या शोधण्यासाठी संपूर्ण कचरा खाली काढण्यात आला. साधारण ३ तासांच्या मेहनतीनंतर त्यांचा ज्वेलरी बॉक्स सापडला'.