(Image Credit : Pedestrian.TV)
दोन तोंडाचा साप तुम्ही कधीना कधी पाहिला असेल किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेलच. पण तुम्ही तीन डोळ्यांच्या सापाबद्दल नक्कीच कधी ऐकलं नसेल. मात्र, ऑस्ट्रेलियातील जंगलात तीन डोळ्यांचा साप आढळून आलाय. ऑस्ट्रेलियातील टेरिटरी ऑफ हंप्टी डूमध्ये अर्नहेम हायवेवर हा पायथन आढळला होता. पण या सापाच्या इतर सर्व गोष्टी सामान्य सापांसारख्याच होत्या. फक्त त्याच्या डोक्यावर एक आश्चर्यकारक तिसरा डोळा होता. विशेष म्हणजे हा डोळा व्यवस्थित होता. रेंजर्सनी या सापाचं नाव मॉंटी ठेवलं आहे.
दुर्देवाने हा साप जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही. गेल्या आठवड्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या विकृतीमुळे त्याला काही खाऊ घालण्यात अडचण येत होती. हा विचित्र साप जवळपास ४० सेटींमीटर लांब होता. मार्च महिन्यात वन्यजीव तज्ज्ञांना हा साप सापडला होता. ते या सापाची काळजी घेत होते, पण सापाच्या विकृतीमुळे त्याचं जगणं कठिण झालं होतं. मॉंटी हा साप कार्पेट प्रजातीचा (Carpet Python) होता. हे साप विषारी नसतात.
एनटी पार्क आणि वन्यजीव अधिकारी रे चॅटो (Ray Chatto) ने गेल्या आठवड्यात सापाच्या मृत्यूची माहिती दिली होती. त्यांनी एनटी न्यूजला सांगितले होते की, 'हे उल्लेखनिय होतं की, या विकृतीसोबतही हा साप इतके दिवस जिवंत राहण्यास सक्षम होता आणि त्याला गेल्या आठवड्यातून मृत्यूआधी काही खाण्यात अडचण येत होती'.
रेंजर्सनी तिसऱ्या डोळ्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी सापाचा एक्स-रे सुद्धा केला होता. याबाबत तज्ज्ञ चट्टो यांनी सांगितले की, 'हे पर्यावरणामुळे नाही तर एक निश्चित नैसर्गिक घटना आहे. अशाप्रकारच्या घटना या प्राण्यांमध्ये होत असतात'.