ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 14 - सोशल मिडियावर केंद्र सरकारच्या दोन मंत्र्यांच्या सक्रियतेवर नेहमी चर्चा होत असते. एक म्हणजे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि दुस-या केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. लोकांनी ट्विटरद्वारे मांडलेल्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना केल्याने अनेकजण आपल्या समस्या यांच्याकडे ट्विटरवरुन मांडतात. मात्र सोमवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे एका व्यक्तीने अशी मदत मागितली जी सुषमा स्वराज यांनादेखील करता आली नाही.
वेंकट नावाच्या व्यक्तीने परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांच्याकडे चक्क फ्रिज खराब झाल्याची तक्रार करत ट्विटवरुन मदत मागितली. वेंकटने फक्त सुषमा स्वराजच नाही तर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनादेखील हे ट्विट केलं. एका कंपनीने मला खराब फ्रिज विकला आहे. कंपनी हा फ्रिज बदलून द्यायला तयार नाही, त्याऐवजी दुरुस्ती करुन घ्या असं म्हणत आहे असं ट्विट या महाशयांनी केलं होतं.
@irvpaswan@SushmaSwaraj Samsung REFRIGERATOR (RT28K3922RZ/HL), bearing serial # (03E04PAH201870M). @Samsung_IN is forcing me go for repair.— Venkat (@M_VenkatM) June 13, 2016
अशा प्रकारच्या ट्विटकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जात. मात्र सुषमा स्वराज यांनी हजरजबाबीपणा दाखवत मी तुम्हाला अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये मदत करु शकत नाही. संकटात सापडलेल्या लोकांची मदत करण्यात मी व्यस्त असल्याचं उत्तर दिलं आहे. यानंतर ट्विटरवर अनेकांनी वेकंटची खिल्ली उडवत सुषमा स्वराज यांच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं.
Brother I cannot help you in matters of a Refrigerator. I am very busy with human beings in distress. https://t.co/cpC5cWBPcz— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) June 13, 2016