लहान मुलं सर्वांनाच आवडतात. पण तुम्हाला जर कोणी लहान मुलाला शेपटी आहे असं सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक दुर्मिळ घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. एका चिमुकलीला जन्मताच सहा सेंटीमीटरची शेपूट असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. देशात अशाप्रकारची पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, चिमुकलीचा जन्म उत्तर पूर्व मेक्सिकोमध्ये Nuevo Leon राज्यातील एका ग्रामीण रुग्णालयात झाला. याचवेळी डॉक्टरांना चिमुकलीला एक शेपूट असल्याचं समजलं. ही शेपूट 5.7 सेंटीमीटर व रुंदी 3 ते 5 मिमि इतकी होती. तर, या शेपटीला थोडे केसदेखील होते, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.
जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरी यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. चिमुकलीची आई जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. तिच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये कोणताही संसर्ग आणि रेडिएशनचा इतिहास नाही. त्यांना आधीही एक मुलगा झाला होता. मात्र तो व्यवस्थित आहे. मात्र मुलीला जन्मतःच शेपूट असल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत.
शेपटी आढळल्यानंतर मुलीची तपासणी करण्यात आली. तेव्हा ती केवळ मांसाचा गोळा असल्याचं समोर आले. तिथे एकही हाड नव्हते. शेपटी मऊ होती, त्वचेने झाकलेली होती आणि त्यावर हलके केस होते. शेपटी हलवल्यानंतर कोणतीही वेदना होत नव्हती, असं निरीक्षण नोंदवलं आहे. सर्व चाचण्या केल्यानंतर एका छोट्याश्या ऑपरेशननंतर मुलीच्या शरीरातून शेपटी काढून टाकण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"