(Image Credit : telegraph.co.uk)(प्रातिनिधीक फोटो)
शाळा आणि कॉलेजेसमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षा तुम्ही नक्कीच दिल्या असतील. सोबतच परीक्षेत केल्या जाणाऱ्या कॉपीबाबत तुम्ही ऐकलं असेलच. बदलत्या काळानुसार कॉपी करण्याच्या पद्धती देखील अधिक आधुनिक होत आहेत. विद्यार्थी कॉपी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावतात. पण बांग्लादेशमधून कॉपीचं एक फारच आश्चर्यकारक प्रकरण समोर आलंय. बरं ही कॉपी करणारा कुणी विद्यार्थी नाही तर देशातील लोकांची लोकप्रतिनिधी आहे.
बांग्लादेशात कॉपी केल्याची आरोपी महिला ही तेथील सत्ताधारी पक्षाची खासदार आहे. तमन्ना नुसरत असं या महिलेचं नाव असून तिने विश्वविद्यालयात परीक्षा देण्यासाठी तिच्यासारख्या दिसणाऱ्या लोकांचाच वापर केला. विश्वविद्यालयाला जशी या घटनेची माहिती मिळाली, त्यांनी तात्काळ कारवाई करत तमन्नाला रस्टिकेट केलं. तमन्ना एक-दोन नाही तर चक्क ८ तिच्यासारख्या दिसणाऱ्या महिलांचा परीक्षेसाठी वापर केलाय आणि यासाठी तिने त्यांना मोठी रक्कमही दिली.
परीक्षेमध्ये होणाऱ्या या कॉपीचा खुलासा बांग्लादेशातील एका टीव्ही चॅनेलने केलाय. जेव्हा या चॅनेलचे प्रतिनिधी परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांचा सामना तमन्ना नाही तर तिच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या महिलेशी झाला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच गोंधळ उडाला.
या चॅनेलला ही माहिती मिळाली होती की, तमन्ना परीक्षेसाठी तिच्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या महिलांचा वापर करत आहे. चॅनेल हे प्रकरण बाहेर काढायचं ठरवलं.
बांग्लादेश ओपन युनिव्हर्सिटीने तमन्ना नुसरत बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे बीएची पदवी घेत होती. त्यासोबतच ती काही प्रोफेशनल कोर्सही करत होती. तेथील एका मीडिया रिपोर्टनुसार, विश्वविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना हे प्रकरण आधीपासूनच माहीत होतं. पण ते गप्प बसले होते. आता सत्ताधारी पक्षाने तमन्नावर कारवाई केली जाणार असे सांगितले आहे.