नशिबाचा काही भरवसा नाही असं म्हणतात. केव्हा तुमचं नशीब उजळेल काही सांगतो येत नाही. असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीसोबत घडला. जेव्हा एटीएम मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे त्याला ९ कोटी रुपयांचा फायदा झाला. आश्चर्य म्हणजे बँकेलाही याची कल्पना नव्हती. या पैशानं या व्यक्तीनं खूप मजा केली आणि पाच महिन्यांत सर्व पैसे खर्च करुन टाकले. मात्र, त्यानंतर त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली. अलीकडेच जेव्हा या व्यक्तीनं पॉडकास्टमध्ये हा संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा ऐकणारेही थक्क झाले.
व्यवसायाने बारटेंडर असलेला डॅन सॉंडर्स हा ऑस्ट्रेलियातील वांगेरट्टा येथील रहिवासी आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे हवेत म्हणून तो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला. १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. पण स्क्रीनवर 'Transaction Cancelled' असा संदेश दिसला. मात्र, त्यानं ट्रेमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला रोख रक्कम मिळाली. खात्यातून पैसेही कापले जात नसल्याचं त्यानं पाहिलं. मग काय काही वेळानं पुन्हा या एटीएममधून ६८ हजार रुपये काढण्याचा त्यानं प्रयत्न केला. परत तोच मेसेज फ्लॅश झाला आणि पैसेही मिळाले. हे करत असताना डॅनने हळूहळू करत ९ कोटी रुपये काढून घेतले.
यानंतर डॅनने बँकेत फोन करून आपल्या खात्यात काही गैरव्यवहार झाला आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बँकेनं समाधानकारक उत्तर दिल्यानं तो निश्चिंत झाला. त्यानंतर ते पैसे घेऊन चकरा मारायला सुरुवात केली. डॅनने प्रसिद्ध रेस्टॉरंट आणि पबमध्ये दारूवर पाण्यासारखे पैसे खर्च करण्यास सुरुवात केली. आपल्या मैत्रिणींना २० सीटर प्रायव्हेट जेटमधून प्रवास करण्यासाठी त्याने ४० लाख रुपये खर्च केल्याचं तपासात समोर आलं. 'द सन'च्या रिपोर्टनुसार, डॅनने एक मिनी बसही भाड्यानं घेतली होती. यानंतर मेलबर्नमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास सर्व बॅकपॅकर्सनी हॉस्टेलच्या बाहेर लोकांना थांबवलं आणि यारा व्हॅलीमध्ये त्याच्यासोबत पूल पार्टी केली.
मात्र, आपण कधीतरी पकडले जाण्याची भीती डॅनच्या मनात नेहमी असायची. अखेर तीन वर्षांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर चोरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवलं. डॅन 2016 मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला. यानंतर या संपूर्ण प्रकरावर चित्रपट बनवण्याची चर्चाही जोरात सुरू होती.