आपण आजपर्यंत शूजची जास्तीत जास्त किंमत ४ हजार रूपये किंवा फार फार तर १० हजार रूपये ऐकली असेल. पण तुम्ही कधी ४.६० कोटी रूपयांचे शूज पाहिले किंवा ऐकले का? नाही ना? पण एका शूजला तेही ३५ वर्ष जुन्या शूजला तब्बल ४.६० कोटी रूपये किंमत मिळाली आहे. आता तुम्ही म्हणाल असं का? तर हे शूज आहेत महान बास्केटबॉल खेळाडू आणि अमेरिकन ड्रीम टीमचा भाग असलेला मायकल जॉर्डनचे.
हे स्नीकर्स आहेत. हे स्नीकर्स सहा लाख १५ हजार डॉलर्समध्ये लिलावात विकण्यात आलेत. क्रिस्टी ऑक्शननुसार, या शूजला ४ कोटी ६० लाख रूपये इतकी किंमत मिळाली. कंपनीने सांगितले की, काही महिन्यांआधीच या बास्केटबॉल स्टारचे शूज रेकॉर्ड किंमतीत विकले गेले होते. यावेळी लिलावात आधीचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
हे शूज एअर जॉर्डन-१ टीमचे आहेत. जे एनबीए स्टारने १९८५ मध्ये एका मॅचमध्ये घातले होते. एएफपीने व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. ही मॅच इटलीमध्ये झाली होती. या मॅचमध्ये जॉर्डनने बॉल इतका जोरात आदळला होता की, बॅकबोर्डची काच फुटली होती. जॉर्डनने त्याच्या १४ वर्षांच्या करिअरमध्ये जेवढे शूज वापरले होते त्या सर्वच शूजचा लिलाव झाला आहे. या सर्व शूजचा लिलाव क्रिस्टी संस्थेद्वारे करण्यात आला होता.
जूनमध्ये जॉर्डन आणि नायकेचं स्वामित्व असलेल्या जॉर्डन ब्रॅन्डने घोषणा केली होती की, समानता आणि सामाजिक न्यायाला प्रेरणा देण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना यातून १० कोटी रूपये दान देतील. मायकल जॉर्डन जगातल्या सर्वात प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक होता. त्याच्या रिटायरमेंटच्या अनेक वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता जराही कमी झाली नव्हती. याच कारणाने त्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.