अनेकांना राग येण्याची वेगवेगळी पद्धत असते. काहींचा राग असा असतो की, त्यांना राग आल्यावर आजूबाजूला असलेली एखादी वस्तू तोडून ते आपला राग व्यक्त करतात. पण नेहमी असं करता येत नाही. काही लोक जोरात ओरडून राग व्यक्त करतात. पण चीनमध्ये लोकांना राग, तणाव आणि डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी नवी पद्धत शोधली गेली आहे. चीनमध्ये यासाठी एका अॅंगर रूमची सुरुवात करण्यात आली आहे. म्हणजे इथे लोक येतात आणि आपला राग काढण्यासाठी हतोड्याच्या मदतीने रूममधील वस्तू तोडणे सुरू करतात. यासाठी त्यांना पैसेही द्यावे लागतात.
बिजिंगमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली अँगर रूम
- बिजिंगमध्ये पहिल्यांदाच स्मॅश नावाने अॅंगर रूमची सुरूवात करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच याची सुरुवात २५ वर्षाच्या जिन आणि त्याच्या काही मित्रांनी केली आहे. इथे दर महिन्याला १५ हजार बॉटल्स ठेवल्या जातात, ज्यावर लोक येऊन राग व्यक्त करतात.
- त्यासोबतच अॅंगर रूममध्ये कप, खुर्ची, टीव्ही, लॅपटॉप, कम्प्युटर, सीपीयू, घड्याळपासून ते वेगवेगळ्या वस्तू आहेत, ज्या तोडून लोकांना समाधान मिळले.
- अॅंगर रूममध्ये ३० मिनिटांसाठी एका व्यक्तीला १६०० रुपये देऊन राग व्यक्त करण्याची संधी मिळते. तेच ग्रुपने गेल्यास ५ हजार रुपये शुल्क द्यावं लागतं. ग्रुपमध्ये जास्तीत जास्त ५ लोक एकत्र जाऊ शकतात.
सुरक्षेची घेतली जाते काळजी
अॅंगर रूममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. त्यांना हेल्मेट आणि हॅंडग्लव्स दिले जातात. जिन सांगतो की, दर महिन्याला त्याच्या दुकानावर ६०० ग्राहक येतात. जिनने ही अॅंगर रूम एका बंद पडलेल्या फॅक्टरीमध्ये सुरू केली आहे.
तणाव कमी करण्याचा उद्देश
जिन सांगतो की, 'अॅंगर रूमचा उद्देश हिंसेला प्रोत्साहन देणे नाही तर लोकांचा तणाव कमी करणे हा आहे. मला माहिती आहे की, लोक सतत तणावात आणि दबावात राहतात. मग ते नोकरी करणारे असो वा उद्योग करणारे. पण माझी ही आयडिया लोकांना पसंत पडत आहे. आता मला मॉलमध्ये अॅंगर रूम सुरु करायची आहे'.
सेकंड-हॅंड सामानाच्या दुकानाशी टायअप
जिनने अॅंगर रूमच्या समोर एक मोठा बोर्डही लावला आहे. ज्यावर लिहिले आहे की, त्यांचं अनेक सेकंड हॅंड वस्तू विकणाऱ्या दुकानांशी टायअप आहे. तो सांगतो की, त्याने हे यासाठी केलं की, लोकांना विश्वास वाटावा की, तोडण्यासाठी खराब टीव्ही, टेलीफोन, घड्याळे, राइस कुकर, साऊंड रेकॉर्डर आणि स्पीकरचा वापर केला जातो.