(Image Credit : randomlyorganizedpop.com)
कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या वागण्यात किती बदल झालाय याची अनेक उदाहरणे या काळात बघायला मिळाली. कोरोनाच्या भीतीमुळे घरातील लोकच एकमेकांशी विचित्र वागत असल्याचं काही ठिकाणी बघायला मिळालं. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये तर एका पतीने कोरोनाच्या भीतीने कहरच केला. त्याने चंडीगढवरून आलेल्या पत्नीला घरातच येऊ दिलं नाही. पत्नी दरवाजा वाजवत राहिली, पण पतीने काही केल्या दरवाजा उघडला नाही. इतकेच नाही तर पत्नी पतीला म्हणाली की, ती स्वत: घरात 14 दिवस क्वारंटाइन राहील, पण पतीने काही केल्या तिचं ऐकलं नाही.
याबाबत महिलेने सांगितले की, ती लॉकडाऊनआधी आपल्या माहेरी गेली होती. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे ती तिकडेच अडकून पडली. तिचा 10 वर्षांचा मुलगाही बंगळुरूमध्ये होता. तीन महिन्यांनी जशी तिला संधी मिळाली ती घरी परत आली. पण पतीने असं विचित्र वागून तिला चांगलाच धक्का दिला.
महिला म्हणाली की, ती घरी परतणार असल्याने आनंदी होती. तिने विचार केला की, तीन महिन्यांनी ती घरी परतत असल्याने पतीही आनंदी असतील. ते तिचं स्वागत करतील. पण असं काहीही झालं नाही. स्वागत तर सोडाच पण त्याने पत्नीला घरात येण्यासाठी दरवाजाच उघडला नाही. महिलेने पतीला सांगितले की, ती क्वारंटाइन राहील, पण पती काहीच ऐकायला तयार नव्हता.
पत्नी अनेक तास घराबाहेर उभी राहून पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत राहिली. अखेर ती थकली आणि थेट पोलिसांना संपर्क केला. तिने याबाबत पोलिसांकडे मदत मागितली. पोलीस जेव्हा तिच्यासोबत घरी पोहोचले तर घराला कुलूप लावलं होतं. तिच्या पतीला फोन लावला तर त्याने फोनही उचलला नाही. अखेर पोलिसांनी महिलेला काही दिवस एखाद्या नातेवाईकाच्या घरी राहण्यास सांगितले.
बाबो! लग्नाच्या मंडपातच नवरीला झाल्या उलट्या; पतीने दवाखान्यात नेताच, झालं असं काही....
बोंबला! ...जेव्हा महापौरच लॉकडाऊनचे नियम तोडून गर्लफ्रेन्ड भेटायला तिच्या घरी जातात!