सांगली - आपल्या देशात जुगाड लावून एखाद्या वस्तूपासून भलतील गोष्ट करणाऱ्यांची काही कमी नाही. अशीच जुगाड लावून तयार केलेली चार चाकी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलाने कारचा हट्ट केल्याने फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणाऱ्या वडिलांनी स्वत:च भंगारामधील टाकावू वस्तूंमधून एकेक वस्तू जमवत ही अफलातून कार तयार केली आहे.
सांगलीमधील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार असे ही कार तयार करणाऱ्या अवलियाचे नाव आहे. जीपसारखा आकार, रिक्षाची चाके, हिरोहोंडाचं इंजिन आणि शेतातील इंजनाची इंधनाची टाकी अशा वस्तू जमवून त्यांनी ही रिक्षापेक्षाही लहान असलेली चार आसनी कार तयार केली आहे. मुलाने हट्ट केल्याने आपल्याला गाडी तयार करण्याची आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. मुलाने कारचा हट्ट धरला होता. मात्र नवी किंवा सेकंड हँड कार घेणे परवडणारे नसल्याने त्यांनी स्वत:च कार तयार करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी एकेक पार्ट गोळा करून त्याआधारे ही कार तयार केली.
दत्तात्रय लोहार या कारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी फिरत असतात. दरम्यान, ही अजब कार पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ही कार तयार करण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आल्याचे दत्तात्रय लोहार यांनी सांगितले. तसेच ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे ४० ते ४५ किमी अंतर कापते असंही त्यांनी सांगितलं. तसेच या कारमधून ड्रायव्हरसह एकूण चार जण प्रवास करू शकतात.
या कारबाबत माहिती देताना दत्तात्रय लोहार यांनी सांगितले की, या कारला दुचाकी पॅशन गाडीचं इंजिन वापरलं आहे. तर पुढचा भाग हा जीपता वापरला आहे. स्टेअरिंग रॉड हा मी स्वत: तयार केला. तसेच चाकं रिक्षाची वापरली. एकूण ५० ते ६० हजारांमध्ये ही कार तयार झाली. दरम्यान, या कारचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच या अजब कल्पनेचं कौतुक होत आहे.