भिलवाडा: शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध वेगळेच असतात. अनेक वर्षे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एकमेकांशी परिचय असतो. आपल्या विद्यार्थ्याने कमावलेले नाव-लौकिक पाहून शिक्षकांनाही अभिमान वाटत असतो. तर, विद्यार्थ्यांनाही शिक्षकांबाबत खूप आदर असतो. विद्यार्थी आणि शिक्षकांमधील ऋणानुबंध दर्शवणारी एक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या निवृत्तीच्या दिवशी त्यांची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत हटके सत्कार केला आहे.
राजस्थानमधील भिलवाडा गावात ही आनंदाची, सकारात्मक बाब घडली आहे. चक्क हत्तीवर बसवून निवृत्त शिक्षकाला निरोप देण्यात आला. फक्त विद्यार्थीच नव्हे तर गावातील अनेकजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. निवृत्त शिक्षकाला निरोप देताना गावातील लोकांना भरुन आले होते. आपल्या विद्यार्थ्यांसोबतच गाववाल्यांशीही घट्ट नाते जोडलेल्या या शिक्षकाला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावल झाले. या शिक्षकाला अनोखा निरोप देण्यात आला. क्वचितच कुण्या शिक्षकाच्या निरोप समारंभाला गजराज बोलावून त्यावरुन मिरवणूक काढत आभार व्यक्त केले गेले असतील.
कायम स्मरणात राहील असा निरोप समारंभ
राजस्थानच्या भिलवाडामध्ये असलेल्या अरवड गावात एक शाळा आहे. या शाळेत भवरलाल शर्मा हे सगळ्या विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे, असे एक शिक्षक. भवरलाल नुकतेच निवृत्त झाले. २० वर्ष शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे आणि चोख कर्तव्य बजावलेल्या या शिक्षकाप्रती आभार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत गावातल्या लोकांनी अनोखी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत हत्तीवर भवरलाल यांना बसवून त्यांची जंगी मिरवणूक गावभर काढण्यात आली होती.
निवृत्तीवेळी मिळालेले दोन लाख रुपये शाळेला केले दान
भवरलाल शर्मा यांनी शिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याचे आणि प्रोत्साहित करण्याचे कामही केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या या शिक्षकाने आपल्या निवृत्तीच्या वेळीही मोठे आणि कौतुकास्पद काम केले आहे. निवृत्तीच्या वेळी मिळालेले दोन लाख रुपये भवरलाल यांनी चक्क शाळेतील विद्यार्थ्यांच्या कॉम्युटर लॅबसाठी दान दिले. मोठ्या थाटामाटात, उत्साहात आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना राजस्थानच्या भिलवाडामधील अरवड गावात निघालेली ही मिरवणूक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनोख्या ऋणानुबंधाचे प्रतीक ठरल्याचे सांगितले जात आहे.