सिंडी क्राफर्ड, नाओमी कॅम्पबेल, जेनिफर लोपेज, शेलेन वुडले, इमा वॉटसन, टेलर स्विफ्ट, शकिरा.. जगभरातील अशा कितीतरी मॉडेल्स, सुपरमॉडेल्स आपल्या परिचयाच्या असतील. प्रत्येकीची वेगळी ओळख.. पण फॅशन आणि मॉडेलिंगच्या जगात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. खरंतर पुरुष माॅडेल्सचीही जगात कमतरता नाही, पण मॉडेल्स म्हटलं की प्रामुख्यानं चेहरे समोर येतात ती महिलांचेच. मॉडेल्स, सुपर मॉडेल्स यांना जगात नेहमीच मागणी असते. कारण अनेक प्रकारची उत्पादनं विकण्यासाठी, त्यांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी या मॉडेल्सचा मोठा उपयोग होतो.
मॉडेल्सच्या या जगात एका महिला मॉडेलनं नुकताच इतिहास रचला आहे. या अमेरिकन मॉडेलचं नाव आहे मार्था स्टुअर्ट! सोशल मीडियावर तिच्या कौतुकाचं वारं सध्या खूप वेगानं वाहतं आहे. कोण आहे ही मार्था आणि असं तिनं केलंय तरी काय, ज्यामुळे जगभरात तिच्या नावाची चर्चा सुरू आहे? - स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या स्वीम शूट इश्यूच्या मुखपृष्ठावर नुकताच तिचा कव्हर फोटो छापून आला आणि जगभरात खळबळ माजली.
तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? एखाद्या मासिकाच्या कव्हरवर एखाद्या मॉडेलचा स्वीम सूटमधला फोटो छापून येणं ही तर अगदीच सामान्य बाब! - बरोबरच आहे, पण यातली विशेष बाब म्हणजे मार्था स्टुअर्ट सध्या ८१ वर्षांची आहे आणि तरीही स्वीम सूटमधल्या तिच्या फोटोची जगप्रसिद्ध अशा मॅगझिननं मुखपृष्ठासाठी निवड केली! अर्थातच वयाच्या ८१व्या वर्षीही मार्थानं टिकवलेलं आपलं तारुण्य, फिगर, उत्साह, त्यासाठी तिनं घेतलेली मेहनत याला तोड नाही. ‘जगात कोणत्याही गोष्टीला वय नसतं, तुमची इच्छाशक्ती असेल, तर वय तुम्हाला बांधून ठेऊ शकत नाही’, ही उक्ती मार्था आजीनं आपल्या उदाहरणातून सिद्ध केली आहे. या फोटोमुळे मार्था स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या कव्हरवर झळकलेली आतापर्यंतची सर्वाधिक वयाची महिला ठरली आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती, ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांची आई, माॅडेल मे मस्क याआधी स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या सर्वाधिक वयाच्या मॉडेल ठरल्या होत्या. गेल्यावर्षी, २०२२मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी मे मस्क यांचा फोटो या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकला होता.यंदा स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडनं आपल्या ‘स्वीम सूट’ इश्यूच्या मुखपृष्ठासाठी चार वेगवेगळ्या मॉडेल्सची निवड केली आणि या चारही मॉडेल्सना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मुखपृष्ठांसाठी जागा दिली. त्यातलं एक मुखपृष्ठ आहे मार्थाचं. इतर तिघे मॉडेल आहेत मेगन फॉक्स, ब्रुक्स नादर आणि संगीतकार कीम पेट्रास.
तुम्हाला जर एखाद्या गोष्टीनं झपाटलेलं असेल तर तुम्ही काय करू शकता, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मार्था. मार्था मुळात जगात फेमस आहेत, त्या शेफ, कूक आणि लेखक म्हणून! वेगवेगळे खाद्यपदार्थ कसे बनवायचे, त्यांना आपल्या हातांचा चवदार स्पर्श देऊन खाणाऱ्यांच्या जिभेवर ते कसे रेंगाळायला लावायचे, यात मार्था यांचा हातखंडा. आतापर्यंत त्यांची तब्बल ९९ ‘चवदार’ बेस्ट सेलर पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
मार्था यांनी सुरुवातीला शेफ म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यात त्यांना प्रचंड यश मिळालं. टीव्हीवर अनेक कुकिंग शेाचं संचालन त्यांनी केलं. त्यानंतर १९८०च्या दशकांत कुकिंगवरील पुस्तकं लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्यांची ही पुस्तकंही लोकांनी डोक्यावर घेतली. या पुस्तकांनी खपांचा विक्रम केला. त्यांनी स्वत:चं लाइफस्टाइल मॅगझिन सुरू केलं. नवनव्या फॅशनचे कपडे, गृहोपयोगी उत्पादनं, कुकिंग.. यासंदर्भातील विक्रीबाबत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर नव्वदच्या दशकात मार्थ वळल्या त्या मॉडेलिंगकडे. वयाच्या जवळपास मध्यावर त्यांनी नव्यानं पाऊल ठेवलेल्या या क्षेत्रातही आपली छाप पाडली.
स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्वीम सूटच्या मुख्य संपादक एम. जे. डे म्हणतात, आणखी तीन महिन्यांनी वयाची ८२ वर्षे पूर्ण करणाऱ्या मार्था यांचं पाऊल कायमच काळाच्या पुढे राहिलेलं आहे. आपल्या इच्छा, कृती आणि निर्णयांवर त्यांनी कधीही नियतीला स्वार होऊ दिलं नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आणि काळानुसार त्या बदलतही गेल्या. एक वेगळ्या प्रकारचं व्यापक साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी नेहमीच स्वत:ला सज्ज ठेवलं. त्याचंच हे फळ आहे.
माझा फोटो पाहून मीच रोमांचित झाले!जेव्हा तुम्ही बदलांना आणि आव्हानांना तयार असता, त्याचवेळी तुम्ही काही करू शकता, हे मार्था यांचं ब्रीदवाक्य आहे. त्या म्हणतात, वयाच्या ८१व्या वर्षी स्वत:चाच स्वीमसूटमधला फोटो पाहताना मी खूपच रोमांचित झाले. माझा हा फोटो पाहून जगभरातल्या वाचकांना कदाचित नवं आव्हान आणि प्रेरणा मिळू शकेल.