मुजफ्फरपूर: बिहारमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथम टप्प्यातील नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांनी मतदारांना विविध प्रकारची आश्वासनं देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच एका उमेदवाराचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. उमेदवारानं दिलेली आश्वासनं पाहून मतदारांना हसू आवरता येत नाहीए.
सोशल मीडियावर व्हायरल झालेलं पोस्टर मुजफ्फरपूरमधल्या मकसूदा ग्राम पंचायतीशी संबंधित आहे. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उतरलेल्या एका उमेदवारानं लोकांना मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. मी सरपंच झाल्यास पूर्ण गावाला सरकारी नोकरी दिली जाईल, गावात विमानतळ उभारलं जाईल, अविवाहित तरुणांना बाईक, भत्ता म्हणून दररोज ५ हजार रुपये खात्यात जमा केले जातील, अशी आश्वासनं उमेदवारानं दिली आहेत.
उमेदवारानं तरुणी आणि वृद्धांनादेखील खास आश्वासनं दिली आहेत. तरुणींना मोफत शिलाई मशीन, ब्युटी पार्लरची सुविधा दिली जाईल. वृद्धांना दररोज तंबाखू आणि विडीचं एक-एक पाकीट देण्यात येईल. उमेदवारानं दिलेली आश्वासनं सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. आश्वासनांची पोस्टर्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहेत.