गोपालगंज: निवडणूक म्हटली की प्रचार आला, जाहीरनामे आले, आश्वासनं आली. पण निवडणूक संपताच सत्ताधाऱ्यांना आश्वासनांचा विसर पडतो. आश्वासनं म्हणजे जुमला होता, असं सत्ताधारी मंडळी सांगू लागतात. त्यामुळेच की काय आता लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडू लागला आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये असाच एक प्रकार दिसून आला. आपण आश्वासनं पूर्ण करू यावर लोकांचा विश्वास बसावा यासाठी एक उमेदवार चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालत गेला.
गोपालगंजच्या शेर ग्राम पंचायतीची निवडणूक आहे. २९ नोव्हेंबरला विविध पदांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अनेक उमेदवारांनी सर्वस्व पणाला लावलं आहे. मुन्ना महतो त्यापैकीच एक. मुन्ना शेर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी रिंगणात आहेत. ते स्वत:ला देवीचे भक्त म्हणवतात. त्यामुळेच निवडणुकीला सामोरं जाण्याआधी त्यांनी अग्निपरीक्षा दिली.
राजकारणी लोकांना दिलेला शब्द पाळत नाहीत. त्यांना आश्वासनांचा विसर पडतो, असा सर्वसामान्यांचा समज असतो. त्यामुळेच मुन्ना महतो पेटत्या निखाऱ्यावरून चालत गेले. बाकीचे उमेदवार आश्वासनं विसरत असतील. पण मी त्यांच्यासारखा नाही. दिलेला शब्द पाळेन, आश्वासनांचा विसर पडणार नाही, असं म्हणत महतो पेटत्या निखाऱ्यांवरून चालत गेले.
मुन्ना महतो पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आपण दररोज देवी मातेची पूजा करत असल्याचं ते सांगतात. या देवस्थानावर दररोज मोठी गर्दी असते. देवीच्या सामर्थ्यावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे. त्याच जोरावर आपण निवडणूक जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.