चोरांना पकडण्यासाठी टेक्नॉलॉजी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर आता सामान्य बाब झाली आहे. चोरही आता या कॅमेरांमुळे धास्तावलेले आहेत. हे कॅमेरे बहुदा तेच लोक लावतात, ज्यांना चोरीची होण्याची भिती असते. मॉल्स, दुकाने, शाळा, इमारती, स्टेशन, रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे आपण नेहमीच बघतो. पण कोणत्याही ठेल्यावर किंवा लोटगाडीवर आपण सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला नसेल. पण आता एका ठेल्यावर फळ विक्री करणारा व्यक्ती सीसीटीव्ह कॅमेरा लावून चांगलाच चर्चेत आला आहे. यातही एक खास बाब म्हणजे या व्यक्तीने चोरांना पकडण्यासाठी नाही तर आपली इमानदारी दाखवण्यासाठी हा कॅमेरा लावला आहे.
ही घटना बिहारच्या नवादा शहरातील हिसुआ बाजारातील आहे. इथे एका फळ विक्रेत्याने त्यांच्या ठेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. या व्यक्तीचं नाव शुभम असून त्यांने सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने बाजारात एकच चर्चा रंगली आहे. पण आश्चर्याची बाब म्हणेज त्याने हा सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षेसाठी नाही तर त्याची इनामदारी दाखवण्यासाठी लावलाय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सीसीटीव्ही कॅमेरा आणि इमानदारीचं काय कनेक्शन?
मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी शुभमच्या दुकानावर एक ग्राहक आला होता. तो फळं विकत घेऊन गेला आणि काही वेळाने पुन्हा परत आला. मोबाइल इथे राहिल्याचं तो म्हणाला. पण खूप शोधूनही मोबाइल सापडला नाही. मग त्या ग्राहकाने शुभमवर मोबाइल चोरीचा आरोप लावत, पोलिसात तक्रार दिली. पण कोणताही पुरावा नसल्याने शुभमला सोडण्यात आलं.
या घटनेनंतर शुभमला ठेल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची कल्पना सुचली. तेव्हा त्याने ११ हजार रुपये बचत करुन सीसीटीव्ही कॅमेरा खरेदी केला आणि ठेल्याच्या वरच्या बाजूला लावला. आणि सीसीटीव्हीची बाकी उपकरणे बाजूला असलेल्या भावाच्या दुकानात ठेवलीत. आता त्याच्यावर कुणीही आरोप लावला तर तो सीसीटीव्हीच्या माध्यमातून पुरावा दाखवू शकतो. शुभमच्या या कल्पेनेचं अनेकांकडून कौतुकही होत आहे.