हितेन नाईकपालघर : रशिया आणि चीनमधील प्रजनन भूमीपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत प्रवास आणि तेथून पुन्हा प्रजनन स्थानापर्यंत असा तब्बल २२ हजार किमीचा मोठा पल्ला गाठत अमूर ससाण्याची जोडी (नर-मादी) पालघरमध्ये दाखल झाली आहे. येथील समुद्रकिनारा त्यांना सुरक्षित वाटत असल्याने त्यांचे दरवर्षी या भागात वास्तव्य दिसते. त्यामुळे निसर्गप्रेमी, छायाचित्रकारांना त्यांच्या निरीक्षणाची संधी मिळते.
अमूर ससाणा (Amur Falcon) (ग्रामीण भागात या पक्ष्याला बाज म्हणतात) हजारो किलोमीटरचा पल्ला गाठत स्थलांतर करणारा शिकारी पक्षी आहे. हिवाळ्यात रशिया आणि चीनमधील त्यांच्या प्रजनन भूमीपासून दक्षिण आफ्रिकेतील ठिकाणापर्यंत प्रवास आणि तेथून पुन्हा प्रजनन स्थानापर्यंत असा तब्बल २२ हजार किमीचा प्रवास हा लहानसा पक्षी वर्षभरात करीत असतो.
लांबच्या प्रवास अंतरात त्याने भारतात काही निवडक विश्रामस्थाने निवडली आहेत. गेली कित्येक वर्षे हे पक्षी ईशान्य भारतातील नागालँड आणि मणिपूर या ठिकाणी नियमितपणे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे तेथील सरकारने त्यांना विशेष संरक्षण दिले आहे. ईशान्य भारतातून निघून अरबी समुद्र ओलांडण्याआधी (Stopover) ते काही वेळा महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि लोणावळा तसेच पालघरमधील समुद्रकिनारी ८ ते १० दिवस मुक्काम करतात. पालघरमधील निसर्ग, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार प्रीतम घरत हे तीन वर्षांपासून त्यांच्या वास्तव्याचे निरीक्षण करीत आहेत.
२०२० साली त्यांना प्रथम नर-माद्यांच्या तीन जोड्या (सहा पक्षी), २०२१ साली दोन जोड्या, तर यंदा एक जोडी पालघर किनारपट्टी भागात आढळून आली आहे. त्यांना नैसर्गिक अधिवासात पाहणे ही पक्षी निरीक्षकांसाठी एक पर्वणीच असते. ८-१० दिवस महाबळेश्वर आणि लोणावळा तसेच पालघरमधील समुद्रकिनारी मुक्काम
पालघर जिल्हा हा जैवविविधतेने अतिशय समृद्ध भूभाग आहे. त्याचे योग्य प्रकारे संरक्षण आणि संगोपन होणे काळाची गरज असल्याने त्यांना सुरक्षित अधिवासाचे संरक्षण करण्याचे पाऊल प्रशासनाने उचलायला हवे. - प्रीतम घरत, पक्षीप्रेमी