मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात राजकीय नेत्यांचे वेगवेगळे कारनामे सतत समोर येत आहेत. तर काही नेत्यांची चांगली कामेही समोर येत आहेत. अशीच एका नेत्याची एक घटना मध्य प्रदेशच्या रीवामधून समोर आली आहे. भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा (MP Janardhan Mishra) यांनी एका कोविड सेंटरमध्ये कमालच केली आहे. त्यांचंं काम पाहून कुणालाही वाटेल की, नेता असावा तर असा. एका कोविड सेंटरमध्ये गेले असता त्यांनी तेथील शौचालय (cleaned toilet in Covid Center) चक्क स्वत:च्या हाताने स्वच्छ केलं.
खासदार मिश्रा यांच्या या कामाची सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू आहे. रीवा लोकसभा मतदार संघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा सोमवारी मऊगंज जनपद तालुक्यात दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी विविध कोविड सेंटरचा दौरा केला. त्यांनी कुंज बिहारी येथील कोविड सेंटरलाही भेट दिली.
टॉयलेट हाताने केलं स्वच्छ
भेटीदरम्यान त्यांची कोविड सेंटरच्या व्यवस्थेची पाहणीही केली. अशात त्यांना येथील शौचालय अस्वच्छ असल्याचं दिसलं. मग काय त्यांनी आधी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आणि त्यानंतर स्वतः शौचालय स्वच्छ करायला सुरूवात केली.
इतकंच काय तर त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचा ब्रश न मिळाल्यानं त्यांनी हातात हातमोजे घालून शौचालय साफ केलं.त्यांचं हे काम पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि अधिकारी सगळेच हैराण झाले. कार्यकर्त्यांनी त्यांचा एक व्हिडीओही काढला. जो नंतर सोशल मीडियावर अपलोड केला. त्यांच्या या कामाचं लोकांनी भरभरून कौतुकही केलं.
याआधीही कामाचं कौतुक...
दरम्यान, याआधीही खासदार मिश्रा स्वच्छतेच्या बाबतीत अनेकदा चर्चेत आले होते. अनेकदा मीडियातून त्यांच्या स्वच्छता मोहिमेचं कौतुकंही केलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या स्वच्छतेप्रति समर्पणाचं कौतुक केलं होतं यापूर्वीही खासदार मिश्रा कोरोना ग्रस्त रुग्णांच्या घरी जावून त्यांची चौकशी केली होती. सोबतच कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोविड वॉर्डात जाऊन साफसफाई करण्याची परवानगी मागितली होती.