जिवंत माणसाच्या शरीरात ७५ टाचपिना हे ऐकून तुम्हाला धक्का बसलाच असेल; परंतु हे सत्य आहे. राजस्थानातील कोटा शहरात हा प्रकार उघडकीस आला. यात विशेष म्हणजे ज्याच्या अंगात टाचपिना होत्या त्यालाच त्याची कल्पना नव्हती. बद्रीलाल मीणा (५६) हे रेल्वेत नोकरीला असून, बऱ्याच दिवसांपासून त्यांचा पायाचा अंगठा दुखत होता. त्यांनी कोटातील डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी सांगितले की, तुमच्या अंगात टाचपिना आहेत. हे ऐकून त्यांच्या कुटुंबियांची झोपच उडाली. मीणा यांना नुकतेच मुंबई सेंट्रलच्या जगजीवन राम रुग्णालयात दाखल केले गेले होते. तेथील तपासणीत त्यांच्या अंगात ७५ टाचपिना असल्याचे उघड झाले. ४० टाचपिना गळ्यात, तर २५ टाचपिना उजव्या पायात आणि १० टाचपिना त्यांच्या दोन्ही हातांत आहेत. बद्रीनाथ मीणा डॉक्टरांना म्हणाले की, त्यांच्या शरीरात या टाचपिना आल्या कुठून हे मला माहीत नाही. डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या शरीरात टोचल्याच्या काही खुणाही सापडल्या नाहीत. आता या टाचपिना शस्त्रक्रिया करून काढल्या जातील. एवढ्या टाचपिना काढण्यासाठी मोठे नियोजन करावे लागेल. बद्रीनाथ हे मधुमेही असल्यामुळे तर खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. बद्रीनाथ मीणा यांचा मुलगा राजेंद्र याने सांगितले की, माझ्या वडिलांना असह्य वेदना होत आहेत. क्ष किरणात दिसणाऱ्या टाचपिना पाहून तो घाबरून गेला आहे. आपले वडील लवकरच बरे व्हावेत अशी प्रार्थना तो करीत आहे.
शरीरात आहेत ७५ टाचपिना
By admin | Published: May 04, 2017 1:10 AM