नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला विचित्र घटना पाहायला मिळतात. यातील काही घटना तर इतक्या अजब असतात, ज्या ऐकून आपण हैराण होतो. सध्या एक अशीच घटना सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या केसांमुळे एका व्यक्तीने नोकरी गमावली आहे. बॉसने एका कर्मचाऱ्याला त्याच्या लांब केसांमुळे चक्क नोकरीवरून काढून टाकलं आहे. या कर्मचाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. जी ऐकून सगळेच हैराण झाले.
सोशल डिस्कशन फोरम साईट रेडिटवर या व्यक्तीने आपली व्यथा सांगितली आहे. त्याने सांगितलं, की नोकरी जॉईन केल्यानंतर पहिले दोन आठवडे बॉस त्याच्या कामावर अतिशय खूश होता. इतकंच नाही तर बॉसने सॅलरी वाढवण्यासंदर्भातही त्याच्यासोबत चर्चा केली होती. मात्र कर्मचाऱ्याला याची कल्पना नव्हती की पुढच्याच आठवड्यात त्याला ही नोकरी गमवावी लागेल. नोकरी जॉईन केल्यानंतर काहीच दिवसात कंपनीच्या मालकाने त्याला तू या कंपनीतील सर्वात हुशार आणि जाणकार व्यक्ती आहेस असं देखील म्हटलं होतं.
अतिशय थंडी असल्याने हा व्यक्ती टोपी घालूनच ऑफिसमध्ये जात असे. मात्र जेव्हा त्याने आपली टोपी काढली आणि बॉसने पहिल्यांदा त्याचे लांब केस पाहिले, तेव्हा बॉस खूपच भडकला. यानंतर रागात बॉसने या व्यक्तीला म्हटलं की लगेचच आपले केस काप. मात्र, या व्यक्तीने आपले केस कापण्यास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या बॉसने या व्यक्तीला अल्टीमेटम दिला आणि म्हटलं की केस न कापल्यास तुला नोकरीवरुन काढून टाकेल.
यानंतर या व्यक्तीने काहीही विचार न करता आपलं सामान घेतलं आणि तिथून निघून गेला. दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीला दुसरी नोकरी मिळाली. त्याची ही पोस्ट वाचल्यानंतर लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या व्यक्तीचं टॅलेंट कौतुकास्पद आहे. सध्या सोशल मीडियावर याचीच तुफान चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.