ऑफिस म्हटलं की कामाचा प्रेशर आला अशावेळी कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईम करुन घेणे ही सामान्य बाब आहे. पण त्याचा कर्मचाऱ्यांना मोबदला दिला जातो. त्यांच्याकडून फुकटात काम करवून घेणं चुकीचंच. पण एका बॉसने हे केलंय पण त्यावर कर्मचारी असे काही संतापले की त्यांनी बॉसची ही शक्कल उघड केली.
The SUN नं दिलेल्या बातमीनुसार एका कंपनीतील बॉसने कर्मचाऱ्यांकडून दर आठवड्यात जवळपास दीड तासाचं अधिक काम फुकटात करून घेतलं. तो रोज त्याच्या कर्मचाऱ्यांकडून १५ मिनिटं अधिक काम करुन घ्यायचा तेही त्यांच्या लक्षात येऊ न देता. एका कर्मचाऱ्यानं याबाबत माहिती दिली. ट्रेनिंगच्या काळात आपल्या सॉफ्टवेअरची वेळ ही खऱ्या वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटं पुढं ठेवण्याची सूचना त्यानं सर्वांना केली होती. त्यानुसार सर्वांनी आपापल्या डिजिटल घड्याळात ६.४५ ची वेळ सेट केली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पेमेंट टाईमशिट चेक केली, तेव्हा ही वेळ ७ दाखवत होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घड्याळाची वेळ ७ वाजता सेट केली. मात्र त्याचेवळी बॉसने सॉफ्टवेअरचं टायमिंग बदललं.
पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे आठवड्याला १.२५ तासांचं नुकसान झाल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली आहे. वर्षाचा विचार केला तर तब्बल ६५ तास अतिरिक्त आणि मोफत काम करवून घेतलं गेल्याचं यातून दिसून येत आहे. ही पोस्ट वाचून नेटिझन्स खवळले आहेत. यावर आतापर्यंत हजारो कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अशा प्रकारांमुळे संताप अनावर होत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे.