जेव्हापासून टीव्हीवर सुपरहिरोंच्या मालिका किंवा सिनेमे मुलांनी बघणं सुरू केलं तेव्हापासून त्यांच्यात एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. मुलांनाही त्या हिरोंसारखं व्हायचं असतं, जे काहीही करू शकतात. आकाशात उडू शकतात, बिल्डींगवर चढू शकतात आणि संकटात असणाऱ्यांना वाचवतात. पण सुपरहिरो बनण्याच्या नादात एका 15 वर्षाच्या मुलाने असं काही केलं जे वाचून तुम्हाला धक्का बसेल. सुपरमॅन बनण्यासाठी त्याने आपल्या शरीरात मर्क्युरीचं म्हणजे पाऱ्याचं इंजेक्शन टोचून घेतलं. मग जे झालं ते हैराण करणारं आहे.
ही घटना अमेरिकेतील आहे. हा मुलगा एक्स-मॅन सुपरहिरो मर्क्युरीने प्रेरित होता आणि त्याला त्याच्यासारखं व्हायचं होतं. दिवसभर त्याच्यासारखाच अभिनय करत राहत होता. एक दिवस त्याला वाटलं की, सुपरहिरोच्या शरीरात कदाचित मर्क्युरी आहे. त्यामुळेच तो हे सगळं काही करू शकतो. यानंतर त्याने स्वत:मध्ये सुपरपॉवर निर्माण करण्याच्या नादात पाऱ्याचं इंजेक्शन टोचून घेतलं. पण सुपरपॉवर मिळण्याऐवजी त्याची हालत खराब झाली. कुटुंबिय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा समजलं की, त्याच्या शरीरात अनेक ठिकाणी अल्सर झाले होते. जे बरे केले जाऊ शकत नव्हते.
डॉक्टरांना हे समजलं नाही की, त्याने नेमकं काय केलं होतं. नंतर सायकॉलॉजिस्टची मदत घेण्यात आली. तेव्हा कुठे मुलाने सांगितलं की, त्याने मुद्दामहून पाऱ्याचं इंजेक्शन टोकून घेतलं होतं. पारा त्याला थर्मामीटरमध्ये सापडला होता. त्याने हे सगळं सुपरपॉवर मिळवण्याच्या नादात केलं होतं. याआधीही त्याने एकदा सुपरमॅन बनण्याच्या नादात अनेकदा कोळींकडून दंश मारून घेतला होता. डॉक्टर म्हणाले की, त्याला कोणताही मानसिक आजार नाही. त्याची आयक्यू लेव्हलही सामान्य आहे.
सुदैवाने मुलाने जे पाऱ्याचं इंजेक्शन घेतलं होतं ते केवळ त्वचेच्या खाली होतं. पारा नसांमध्ये पोहोचला नव्हता. असं झालं असतं तर रक्त गोठलं असतं आणि लगेच त्याच्या मृत्यू झाला असता.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या एका रिपोर्टमध्ये या केसचा तपशील देण्यात आला आहे. त्यात लिहिण्यात आलं की, कशाप्रकारे अल्सर खास वैज्ञानिक पद्धतीने काटून काढण्यात आले. अनेकदा सर्जरी केल्यानंतर आता त्याची स्थिती ठीक आहे. डॉक्टरांनी इशारा दिला की, मुलांनी अशा गोष्टी करू नये. कारण या जीवघेण्या ठरू शकतात.