असे अनेक सीन आपण सिनेमात पाहिलेले असतात, ज्यात कुणीतरी तलावात पोहायला जातं आणि अचानक त्यांना अनेक वर्ष जुना कुणीतरी लपवलेला खजिना सापडतो. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली असून यातून अनेक वर्षांआधी झालेल्या एका दरोड्याचा उलगडा झालाय.
अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनातील एका तलावात एक लॉक असलेला बॉक्स एका ६ वर्षाच्या मुलाला सापडला. नॉक्स ब्रेवर नावाच्या या मुलानं ‘मॅग्नेट फिशिंग’ करत असताना एक जुना बॉक्स शोधून काढला.
मुलाच्या आई-वडिलांनी एका टीव्ही चॅनेलसोबत बोलतांना या बाबतीत माहिती दिली की, ते कुटुंबियांसोबत व्हिटनी लेकवर गेले होते. यावेळी फिशिंग करताना त्याच्या गळात काहीतरी अडकल्याचं जाणवलं. त्याच्या गळाला लावलेल्या चुंबकाला खाली एक जड वस्तू चिकटली. बायोडरच्या मदतीनं नॉक्सनं ती वस्तू वर ओढली. गळा्च्या चुंबकाला लागून कचऱ्याखाली दडलेले दागिने, क्रेडिट कार्ड आणि एक चेकबुक असलेला एक बॉक्स बाहेर आला.
मुलाचे वडील जोनाथन ब्रेवरनं सांगितलं, ‘मला माहिती होतं की, योग्य काम करायला पाहिजे. म्हणून आम्ही स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांच्या मदतीनं हे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न केला’.
अधिकाऱ्यांना आढळलं की, या वस्तू एका महिलेच्या आहेत. जी तलावाजवळच रस्त्याच्या पलीकडे राहत होती. त्या महिलेला याबाबत विचारण्यात आलं. महिलेनं सांगितलं की, हे दागिने आणि वस्तू तिच्या घरातून आठ वर्षांपूर्वी चोरीला गेल्या होत्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार महिलेला तिच्या जुन्या बांगड्या पुन्हा इतक्या वर्षांनी परत मिळाल्या. जोनाथन ब्रेवरनं सांगितलं की, ‘पहिली गोष्ट जी त्या महिलेनं केली, ती म्हणजे ती आपल्या गुडघ्यावर बसली आणि नॉक्सला मिठीत घेतलं. त्याचे आभार मानले.’