भारतात दरवर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका होतात. निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी उमेदवार स्टंटबाजी करताना दिसतात. मोठ्या निवडणुकांमध्ये तर ही बाब आता सामान्य आहे, पण विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्येही आता असे प्रकार घडू लागले आहेत. राजस्थानच्या भरतपूरमधून एक विचित्र घटना समोर आली. या घटनेत विद्यार्थी युनियन निवडणुकीत मत मागण्यासाठी उमेदवार चक्क मुलींच्या पाया पडत असल्याचे दिसून आले.
आज राजस्थानमधील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. कोरोना महामारीमुळे राज्यात तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका होत आहेत. जयपूरमधील राजस्थान विद्यापीठ या राज्याच्या प्रमुख शैक्षणिक संस्थेमध्ये सुमारे २० हजार ७०० विद्यार्थी त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावला. राज्यभरातील सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळाली असून दुपारी एक वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. याच निवडणुकीसाठी उमेदवार हात जोडून मते मागत होते, पण एका उमेदवाराने थेट विद्यार्थीनीचे पायदेखील धरून मत देण्यासाठी प्रचार केला. त्याचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला.
राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत मुख्य लढत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात आहे. राजस्थान विद्यापीठाच्या अध्यक्षपदासाठी NSUI कडून रितू बराला, ABVP कडून नरेंद्र यादव, अपक्ष निहारिका जोरवाल, निर्मल चौधरी, प्रतापभानू मीना आणि हितेश्वर बैरवा हे रिंगणात होते. निहारिका ही राज्य सरकारमधील मंत्री मुरारी लाल मीना यांची मुलगी आहे, तिने NSUI चे तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.