प्रियकराने लग्नास नकार दिल्याने पोलिसांकडे गेली तरूणी, त्यांनी स्टेशनमध्ये लावलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:29 AM2024-01-19T11:29:23+5:302024-01-19T11:30:05+5:30
इथे राहणारी अर्चना गोयलचं तिच्या शेजारी राहणाऱ्या अविनाश गोयलसोबत अफेअर होतं.
साधारण 12 वर्षापासून अफेअर सुरू होतं, पण घरातील लोकांचा विरोध असल्याने अचानक प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला. हे जेव्हा त्याच्या प्रेयासीला समजलं तेव्हा ती कुटुंबियांना घेऊन पोलिसांकडे गेली. नंतर पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून त्यांचं लग्न लावून दिलं. पोलिसांनी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मध्य प्रदेशच्या भिंडमधील जामना रोड येथील ही घटना आहे. इथे राहणारी अर्चना गोयलचं तिच्या शेजारी राहणाऱ्या अविनाश गोयलसोबत अफेअर होतं. 12 वर्षांपासून दोघांचे प्रेम संबंध होते. यादरम्यान अविनाश अर्चनाला अनेकदा म्हणाला की, तो तिच्यासोबत लग्न करेल. पण काही काळाने अविनाशवर त्याच्या कुटुंबियांचा दबाव वाढत गेला आणि याच कारणाने अविनाशने लग्न करण्यास नकार दिला होता.
12 वर्षांपासून अविनाशवर प्रेम करणाऱ्या अर्चनाला हे सहन झालं नाही आणि ती कुटुंबियाना घेऊन पोलिसांकडे गेली. इथे पोलीस अधिकारी प्रदीप सोनी यांनी अविनाश आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. इथे तरूणाच्या कुटुंबियांचं काउन्सेलिंग करण्यात आलं. मोठ्या मुश्कीलीने अविनाश आणि त्याचे कुटुंबिय या लग्नासाठी तयार झाले.
यानंतर पोलिसांनी जराही वेळ न घालवता पोलीस स्टेशनमध्येच अर्चना आणि अविनाशच्या लग्नाची तयारी केली. पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या एका मंदिरात त्यांचं रितीरिवाजानुसार लग्न लावण्यात आलं. दोघांनाही पोलिसांनी सुखी संसाराच्या शुभेच्छा दिल्या.
पण लग्न होऊनही नवी नवरी अर्चना मनापासून आनंदी नव्हती. ती म्हणाली की, तिला अशाप्रकारे लग्न करायचं नव्हतं. पण स्थिती अशी बनली होती की, तिला लग्न करावं लागलं. हे सांगत असताना तिच्या डोळ्यात पाणीही आलं. अविनाश म्हणाला की, तो तिला आयुष्यभर साथ देणार आणि तिला खूश ठेवण्याचा विश्वासही त्याने दिला.