टेक्सास: अमेरिकेतील टेक्सासमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बागेमध्ये खेळायला गेलेल्या मुलासोबत अशी घटना घडली की, काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. बागेत खेळ असताना मुलगा मेंदू खाणाऱ्या अमीबाच्या संपर्कात आला. अमीबाने नाक किंवा तोंडातून मुलाच्या मेंदूत प्रवेश केला असावा, ज्यामुळे 6 दिवसात त्याचा मृत्यू झाला.
का आहे इतका धोकादयक ?सार्वजनिक उद्यानांमधील कारंजे, नोजल आणि इतर वॉटर-स्प्रेची वेळेवर साफसफाई न झाल्यामुळे मेंदू खाणारा अमीबा त्यावर जमा होतो. या अमीबाने नाक किंवा तोंडावाटे शरीरात प्रवेश केला तर ते अतिशय घातक ठरू शकतं. एका रिपोर्टनुसार, अशा प्रकारच्या अमीबाची लागण झालेल्या 95 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.
हा अमीबा घाणीत वाढतो
तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अमीबा घाणीत किंवा घाण पाण्यात वाढतो. याला पोषक वातावरण मिळाल्यावर अमीबाची झपाट्याने वाढ होते. दरम्यान, मुलाच्या आजाराची माहिती मिळताच आरोग्य अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला असून, अधिकाऱ्यांनी स्प्लॅश पॅडच्या पाण्यात अमीबा असल्याची पुष्टी केली आहे. तसेच, आर्लिंग्टनमधील सर्व सार्वजनिक स्प्लॅश पॅड बंद करण्यात आले असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.