कुत्र्यांच्या इमानदारीच्या वेगवेगळ्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. अशीच एक घटना फ्लोरिडातून समोर आली आहे. इथे एका कुत्र्याने परिवाराचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव गमावलाय. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, रात्री साधारण दीड ते दोन वाजता फ्लोरिडातील या घरातील फायर अलार्म बंद होण्याआधी अनेकदा वाजला. मात्र, त्याने घरातील लोकांची झोप काही उघडली नाही. अशात जिप्पी(जॅक रसेल टेरिअल, कुत्र्याची एक प्रजाती)ला धोका लक्षात आला. तो घरात इकडे-तिकडे धावू लागला आणि बटलर परिवाराला झोपेतून जागं करण्यासाठी भूंकू लागला.
इतकेच नाही तर जिप्पी परिवारातील लोकांना जागवण्यासाठी आगीतून गेला. त्याच्या समजदारपणामुळे बटलर परिवारातील लोक घरातून सुरक्षित बाहेर पडू शकले. पण बाहेर आल्यावर काही वेळाने घराचे मालक लेरॉय बटलर यांच्या लक्षात आले की, जिप्पी अजूनही आगीने पेटलेल्या घरातच आहे. त्यांनी त्याला वाचवण्यासाठी पुन्हा घरात जाण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आग अधिकच वाढली होती.
अग्नीशमन दलाच्या जवानांची वाट पाहण्याशिवाय लेरॉय बटलर यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता. आग विझवल्यावर ते घरात गेले तोपर्यंत जिप्पी धुरामुळे गुदमरून गेला होता. बटलर यांनी सांगितले की, 'लिव्हिंग रूममधील फरशीवर आग होती, त्यामुळे तेथून बाहेर पडण्यासाठी त्याला मार्गच उरला नसेल'.
बटलर यांनी सांगितले की, 'जिप्पी एक छोटासा जॅक रसेल टेरिअर होता. एक छोटा काळा-पांढरा कुत्रा. त्याला तीन वर्षांपूर्वी आम्ही घेऊन आलो होतो. त्याची आम्हाला खूप आठवण येईल. आम्ही त्याच्यामुळेच वाचू शकलो'.