गेल्या २ वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटनं जगातील सर्व देशांसमोर मोठं आव्हान उभं केले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी रात्रंदिवस मेहनत करुन लसीची निर्मिती केली. सध्या कोरोनावर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. लसीकरण केलेल्यांना कोरोनाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ कमी येते. मृत्यूचा धोका कमी होतो. त्यामुळे अनेक देशांना लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन(omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. काही देशांनी लॉकडाऊनसारखी पाऊलं उचलली आहे. ओमायक्रॉनमुळे घरातून बाहेर पडण्यावरही निर्बंध आले आहेत. भारतात गेल्या २४ तासांत २ लाख ७० हजार रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसच्या प्रकोपातून सुटका करण्यासाठी जगात लसीकरण केले जात आहे. काहींनी बूस्टर डोसही घेतले आहेत. त्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ब्राझीलमध्ये एका युवकाने वडिलांना कोरोनाची लस देण्यासाठी तब्बल ६ तास पाठीवर घेऊन प्रवास केला आहे. याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा फोटो पाहून अनेक जण युवकाचं कौतुक करत आहेत. भारतात तर या युवकाला आधुनिक युगातील श्रावणबाळ अशा शब्दात त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत आहेत. व्हायरल होणारा फोटो २४ वर्षीय तावीचा आहे. हा युवक कुटुंबासह ब्राझीलच्या अमेजॉन इथं राहतो. तो ६७ वर्षीय पित्याला पाठीवर बसवून चालत असल्याचा व्हिडीओ आहे.
रिपोर्टनुसार, युवक त्याच्या वडिलांना कोरोनाची लस देण्यासाठी लसीकरण केंद्रावर घेऊन जात आहे. तब्बल ६ तास त्याने वडिलांना पाठीवर बसवून इतक्या लांबचा पल्ला गाठला. लसीकरण केद्रांवर जेव्हा हा युवक पोहचला तेव्हा अधिकाऱ्यांनीही त्याचे कौतुक केले. वडिलांचे लसीकरण झाल्यानंतर पुन्हा ६ तास पायपीट करत वडिलांना पाठीवर घेऊन तो त्याच्या घरी परतला. हा व्हायरल होणारा फोटो डॉ. एरिक जेनिंग्स सिमोस यांनी क्लिक केला आहे. डॉ. एरिक म्हणाले की, युवकाचे वडील चालण्यास असमर्थ होते. मात्र मुलाने वडिलांना कोरोना लस द्यायची हे निश्चित केले होते. हा फोटो जानेवारी २०२१ मध्ये काढण्यात आला होता. त्यावेळी ब्राझीलमध्ये लसीकरण अभियान मोठ्या प्रमाणात सुरु होते. हा फोटो डॉ. एरिक यांनी १ जानेवारीला त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.