सिडनी : आॅस्ट्रेलिया संसदेच्या सिनेट या वरिष्ठ सभागृहाच्या एका महिला सिनेटरने आपल्या नवजात बाळाला सोबत आणून आणि सभागृहाचे कामकाज सुरु असताना त्याला स्तनपान देऊन मंगळवारी नवा राजकीय इतिहास घडवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.ग्रीन्स पार्टीच्या सिनेटर लारिसा वॉटर्स काही दिवसांपूर्वी प्रसूत होऊन त्यांना दुसरे कन्यारत्न झाले. या बाळंतपणानंतर मंगळवारी प्रथमच सिनेटच्या बैठकीला उपस्थित राहताना लारिसा आपल्या नवजात मुलीला सोबत घेऊन आल्या. एवढेच नव्हे तर सभागृहात एका प्रस्तावावर मतदान सुरु असतानाच्या मधल्या वेळात त्यांनी मुलीला स्तनपानही दिले.संसदेत बाळाला स्तनपान देणाऱ्या लारिसा वॉटर्स यांचे छायाचित्र समाजमाध्यमांतून व्हायरल झाले आणि याचे तोंडभरून कौतुकही झाले. स्वत: वॉटर्स यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘माझी मुलगी अलिया संघीय संसदेत स्तनपान करणारे पहिले मूल ठरले याचा मला खूप अभिमान वाटतो. संसदेत अधिक संख्येने महिला आणि स्तनदा माता येण्याची गरजआहे’.गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमामुळे वॉटर्स यांना हे करणे शक्य झाले. अलिकडच्या काही वर्षांमध्ये राजकीय नेत्यांमध्ये ‘बेबी बूम’ आल्यानंतर संसदेचे नियम अधिक कुटुंबवत्सल करण्यात आले. पूर्वीच्या नियमांनुसार संसद सदस्य त्यांच्या मुलांना सभागृहात आणू शकत नव्हते. याचा संदर्भ देत वॉटर्स यांनी टिष्ट्वटरवर असेही लिहिले की, व्हिक्टोरिया राज्याच्या एका महिला सदस्याने तिच्या ११ दिवसांच्या मुलाला सभागृहात स्तनपान दिले म्हणून बाहेर काढले गेले होते. (वृत्तसंस्था)युरोपीय व स्पेनच्या संसदेत सदस्य त्यांच्या तान्ह्या मुलांना सोबत घेऊ जाऊ शकतात.लारिसा वॉटर्स यांनी आता त्यांच्या फेसबूकचे प्रोफाईल बदलले असून त्यात त्या बाळाला सिनेटमध्ये स्तनपान देत असल्याचे छायाचित्र टाकले आहे. यावर समाजमाध्यमांत बव्हंशी सकारात्मक आणि शाबासकीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.(वृत्तसंस्था)सार्वजनिक ठिकाणी स्तनपान देणे हा अनेक देशांमध्ये गरमागरम चर्चेचा विषय ठरला आहे आणि अनेक देशांमध्ये महिला संसद सदस्यांना त्यांच्या तान्ह्या मुलांना सभागृहात सोबत नेल्याबद्दल टीकेचे धनी व्हावे लागले आहे. गेल्या वर्षी आइसलँडमध्ये एका महिला सदस्याने बाळाला स्तनपान देत असताना संसदेत भाषण केले होते. महिलांना यापुढेही मुले होतच राहणार आहेत. त्यामुळे त्यांना कामही करायचे असेल व मुलांचेही संगोपन करायचे असेल त्यांना आपण ही सवलत द्यायलाच हवी. जगभरातील संसदेत हाच ट्रेंड आहे. आता आॅस्ट्रेलियाच्या सिनेटमध्येही हे होऊ शकले ही फार मोठी गोष्ट आहे. -केटी गॅलेघर, लेबर पार्टीच्या संसद सदस्या
संंसदेत महिला सदस्याने बाळाला दिले स्तनपान!
By admin | Published: May 11, 2017 12:32 AM