देशभरात सध्या सगळीकडे लग्नांचा सीझन सुरू आहे. रोज कितीतरी जोडपी लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. तर काही लग्ने लागण्याआधीच मोडली जात आहेत. अशीच एक घटना झारखंडमधून समोर आली आहे. इथे लग्नाच्या ऐनवेळी म्हणजे हार घालण्याच्या रिवाजाआधी नवरी प्रियकरासोबत फरार झाली. सध्या या लग्नाची चर्चा परिसरात सुरू आहे.
ही घटना झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील आहे. येथील एका गावातील मंदिरात सोमवारी रात्री ही घटना घडली. लग्न मंडपातून एक नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. वरात घेऊन आलेल्या नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं.
दोन्हीकडील लोकांनी बीदीडीहच्या बगलासोत शिव मंदिरात लग्न समारंभाचं आयोजन केलं होतं. रात्री मुलीकडील लोक मंदिराच्या परिसरात लग्नाचे रितीरिवाज पार पाडत होते. वरात आली त्यांचं जोरदार स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर लग्नासंबंधी इतर रितीरिवाज पार पाडले गेले. हार घालण्याची वेळ आली तेव्हा काही कारण सांगत नवरी बाजूला गेली. तिला बोलवण्यासाठी एकाला पाठवण्यात आलं तर ती गायब होती.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मंदिरापासून 300 मीटर दूर बाइकवर एक तरूण हाती दोन हेल्मेट घेऊन उभा होता. अचानक नवरी लेंहगा घालून मंडपातून बाहेर आली. तिने आतून जीन्स घातली होती. बाहेर आल्यावर तिने लेंहगा काढला आणि हेल्मेट घालून बाइकवरून निघून गेली. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.