देशात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे लग्नातील एक मजेदार, वादग्रस्त व्हिडीओ नेहमीच बघायला मिळतात. लग्नासंबंधी वेगवेगळ्या विचित्र घटनाही समोर येतात. जसे की, नवरी लग्नाच्या दिवशी पळून गेली तर कुठे नवरदेवाने वेळेवर लग्नास नकार दिला अशा घटना समोर येत असतात. अशात उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur) एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका नवरीने लग्न करण्यास नकार दिला. याचं कारण वाचून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कानपूरच्या देहातच्या एका गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न भोगनीपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत ठरलं होतं. मंडप सुंदर सजवण्यात आला. वरात आली तेव्हा पाहुण्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर नवरी आणि नवरदेव हार घालण्यासाठी स्टेजवर पोहोचले. तेव्हा नवरीच्या लक्षात आलं की, हे यादगार क्षण कैद करण्यासाठी फोटोग्राफरच नाहीये. अशात नवरीने लग्नास नकार दिला. इतकंच नाही तर स्टेजवरून खाली उतरून नवरी शेजारच्या घरी निघून गेली.
वेळेवर झालेल्या या गोंधळानंतर सर्वांनी नवरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती म्हणाली की, ज्या व्यक्तीला आज आमच्या लग्नाबाबत काहीच वाटत नाही, तो भविष्यात माझा सांभाळ कसा करेल? परिवारातील वृद्ध लोकांनीही तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही.
वाद इतका पेटला की, हे प्रकरण नंतर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं. इथे दोन्ही पक्षांनी देण्यात आलेले पैसे आणि दागिने परत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकारी डोरी लाल म्हणाले की, प्रकरण दोन्हीकडील लोकांच्या सहमतीने सोडवण्यात आलं. ते म्हणाले की, दोन्ही पक्षांनी एकमेकांना दिलेल्या वस्तू आणि पैसे परत केले. त्यानंतर नवरदेव नवरीला न घेताच आपल्या गावी परत गेला.