Canada Pink Sky: तुम्ही घरातून बाहेर आलात आणि संपूर्ण आकाश गुलाबी दिसू लागलं तर? कधी-कधी निसर्गात अशा काही घटना घडतात, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत होतात. असाच काहीसा प्रकार ब्रिटनच्या केंटमध्ये घडला. गुरुवारी सकाळी आकाश अचानक गुलाबी दिसू लागले. यामुळे परिसरात घबराट पसरली.
'पृथ्वी नष्ट होणार की, एलियन्सचा हल्ला'हे दृष्य पाहून केंटमधील लोक भयभीत झाले. जग संपणार किंवा एलियन्सने हल्ला केला, असे काहींना वाटू लागले. हे दृष्य एखाद्या साय-फाय चित्रपटासारखेच होते. सूर्योदय होण्याआधी घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये आकाश अतिशय गुलाबी झालेले दिसत आहे. हे फोटो ऑनलाइन शेअर करताना एका व्यक्तीने गंमतीत म्हटले की, "मला वाटले हा जगाचा अंत आहे, मी चार घोडेस्वारांना शोधत होतो."
गुलाबी रंगाचे कारण काय?नंतर याचे कारण समोर आले, जे विज्ञानावर आधारित आहे. 400 मिलियन टोमॅटो पिकवणाऱ्या एका कृषी कंपनीने हा कृत्रिम प्रकाश सोडला होता. रिपोर्टनुसार, Thanet Earth हा बर्चिंग्टन स्थित एक मोठा औद्योगिक कारखाना आहे. हा देशातील सर्वात मोठा ग्रीनहाऊस परिसर आहे, ज्यामध्ये 90 एकर जमीन व्यापलेली आहे.
Thanet Earth वेबसाइटनुसार, या विशाल ग्लासहाऊसमध्ये दरवर्षी अंदाजे 400 मिलियन टोमॅटो, 30 मिलियन काकडी आणि 24 मिलियन मिरचीचे उत्पादन होते. मोठ्या कॉम्प्लेक्ससाठी दक्षिण-पूर्व भाग निवडला गेला, कारण यात दीर्घकाळ सूर्यप्रकाश असतो. यामुळे वनस्पतींनाही चांगला फायदा होतो. हिवाळ्यात वनस्पतींना जास्त प्रकाशाची गरज असते, म्हणून वर्षाच्या यावेळी कृत्रिम प्रकाशाचा वापर केला जातो. लाईट टोमॅटो आणि मिरचीवर पडून बाउंस होतो, ज्यामुळे आकाशात गुलाबी रंग दिसू लागतो. या भागात गुलाबी रंग दिसण्याचे हेच कारण आहे.