नाष्ता म्हटलं की, पोहे, उपमा यानंतरचा आणि सगळ्याच्या आवडीचा ऑप्शन म्हणजे इडली, इडली हा मुळचा दक्षिण भारतातील पदार्थ असला तरी संपूर्ण भारतात रोज, आवडीने खाल्ला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कमीत कमी पैश्यात भूक भागवण्यासाठी अनेकांना इडली चटणीचा आधार मिळतो. शहरांमध्ये, उपनगरांनगरांमध्ये गल्लोगल्ली, प्रत्येक कोपऱ्यावर एकतरी इडली, डोसा विकणाऱ्याची गाडी असतेच. सध्या इडली खूप चर्चेत आहे अर्थात त्याला कारणंही तसंच आहे.
इडलीमुळे ब्रिटनमधील एका इतिहासाच्या प्राध्यापकाला मात्र भारतीयांच्या संतापाला सामोरे जावे लागले. ब्रिटीश प्राध्यापक एडवर्ड अँडरसन यांनी इडलीला चक्क बोरिंग पदार्थ म्हटले होते. त्यांनी सोशल मीडियावर इडलीबाबत असं मत व्यक्त करताच ही पोस्ट व्हायरल झाली. एका भारतीय फूड डिलिव्हर कंपनीने सोशल मीडियावर साधा प्रश्न विचारला होता. अशी कोणती डिश आहे की तुम्हाला समजत नाही की लोकांना का आवडते, या प्रश्नाला उत्तर देत उत्तर देताना ब्रिटीश प्राध्यापक एडवर्ड अँडरसन यांनी इडलीला जगातील सर्वात बोरिंग पदार्थ असल्याचे म्हटले. त्यांच्या उत्तरावर भारतीय खाद्यप्रेमी संतापले. इडलीच्या समर्थनासाठी सर्व भारतीय एकजूट झाले आणि टिकेचा भडीमार सुरू झाला.
अनेकांनी इडलीमुळे संपूर्ण दक्षिण भारत एकवटला असल्याचे म्हटले. काँग्रेस नेते शशी थरूर यांचा मुलगा ईशान थरूर याने आतापर्यंत ऐकलेले सर्वात आक्षेपार्ह पदार्थ असल्याचे म्हटले. शशी थरूर यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जीवन काय असते, हे समजू न शकणाऱ्या माणसावर दया दाखवा, असं ट्विट थरूर यांनी केले.
एडवर्ड अँडरसन यांनी उत्तर देताना, एका ट्विटमध्ये म्हटले की, संपूर्ण दक्षिण भारताने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी, मी फक्त इतकेच म्हणू शकतो की इटली सोडता मला अप्पम, डोसा असे सर्व दक्षिण भारतीय खाद्य आवडतात. इडलीवरून सुरू असलेली टीकेची झोड लक्षात घेता अँडरसन यांनी आपण दुपारच्या जेवणात इडली खाणार असल्याचे ट्विट करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.