ब्रिटनच्या यॉर्कशायरमधील शेफिल्डमध्ये वास्तव्यास असलेल्या ३१ वर्षीय महिलेच्या घरी एकाच वर्षात चारवेळा पाळणा हलला आहे. जेसिका प्रिचर्ड असं या महिलेचं नाव आहे. जेसिकानं मे २०२० मध्ये मुलीला जन्म दिला. त्यानंतर ११ महिन्यांनी म्हणजेच या वर्षी एप्रिलमध्ये जेसिकानं एकाचवेळी ३ मुलांना जन्म दिला. डेलीमेलनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
गेल्या वर्षी जन्मलेल्या मुलीचं नाव मिया ठेवण्यात आलं आहे. एप्रिलमध्ये जन्मलेल्या मुलांना एला, जॉर्ज आणि ओलिविया असं नामकरण करण्यात आलं आहे. तिघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांचं वजन कमी आहे. सर्वसाधारण नवजात बालकांचं वजन दोन ते अडीच किलोग्रॅम असतं. पण तिन्ही मुलांचं वजन पावणे दोन किलोपेक्षा आहे.
जेसिका ऑक्टोबरमध्ये मॅटर्निटी लिव्हवर होती. त्यावेळी तिला गरोदर असल्याचं समजलं. साडे सात महिन्यांनंतर जेसिकानं तीन मुलांना जन्म दिला. नवजात बालकं साडे सात महिनेच जेसिकाच्या पोटात होती. त्यानंतर तिची प्रसूती झाली. त्यामुळे तिन्ही मुलांना २ महिने रुग्णालयात ठेवण्यात आलं. गेल्याच महिन्यात त्यांना घरी आणण्यात आलं.
जेसिका प्रिचर्डला एक ८ वर्षांची एक मुलगी आहे. एका वर्षात ४ मुलांचा जन्म झाल्यानं जेसिकाचे पती हॅरी विलियम्स अवाक् झाले आहेत. तिळं होईल अशी अपेक्षा हॅरी आणि जेसिकाला नव्हती. त्यामुळे तीन बाळं जन्माला येताच दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हे दाम्पत्य स्वत:ला भाग्यवान समजत आहे.