प्रेमात लोक काहीही करायला तयार होतात. अशाच प्रकारची एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. ब्रिटनमध्ये राहणारी एक महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन अमेरिकेत गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा प्रियकर कैदी आहे आणि पत्राद्वारे ती त्या कैद्याच्या प्रेमात पडली.
द सन या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या केटीने राईट अ प्रिझनर डॉट कॉम या वेबसाइटवर डॅनी नावाच्या कैद्याला पत्रे लिहायला सुरुवात केली. पण काही दिवसानंतर ती त्या कैद्याच्या प्रेमात पडली. केटीने स्वतःच्या आणि डॅनीच्या नावाने टिकटॉक खाते(@katiedanny12) देखील तयार केले आहे.
आपल्या प्रेमाबद्दल केटीने सांगितले की, पत्र लिहिताना दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले की हे संभाषण व्हिडिओ कॉलपर्यंत पोहोचले होते. मग दोघेही कधी-कधी व्हिडिओ कॉलवर बोलायचे. डॅनीवर चोरी आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. त्याला 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापैकी डॅनीने 5 वर्षे तुरुंगात काढली आहेत, लवकरच तो तुरुंगातून बाहेर येईल.
केटी पुढे म्हणाली की, मी डॅनीच्या इतकी प्रेमात पडले की, त्याला भेटण्याचा निर्णय घेतला. कॅटीने ब्रिटन ते अमेरिका प्रवासाचा अनुभवही तिच्या टिकटॉक अकाउंटवर शेअर केला आहे. डॅनीला पहिल्यांदा भेटून ती खूप उत्साहित होती, पण तिला थोडी भीतीही वाटत होती. अखेर डॅनीला डोळ्यासमोर पाहताच दोघेही खूप आनंदीत झाले. दोघांना एकमेकांशी बोलण्यासाठी 4 तासांचा वेळ देण्यात आला होता. यादरम्यान दोघांनी खूप गप्पा मारल्या.
केटीने सांगितल्यानुसार, डॅनी तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर ते दोघे लग्न करणार आहेत. दरम्यान, केटीला भेटून खूप आनंद होत असल्याचे डॅनीने म्हटले. त्याने केटीला त्याचा टी-शर्ट भेट म्हणून दिला आहे. या दोघांची लव्हस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.