बिहारच्या सारण जिल्ह्यात एका लग्नात चांगलाच गोंधळ झाला. लग्नासाठी तरूणीच्या घरी वरात घेऊन पोहोचलेल्या नवरदेवाच्या प्रेम प्रकरणाचा अचानक खुलासा झाला. त्यानंतर लग्नात वाद पेटला होता. अशात नवरदेवाचं त्याच्या प्रेयसीसोबत लग्न लावून देण्यात आलं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरदेवाची प्रेयसी दुसरी कुणी नसून त्याची होणारी मेहुणीच निघाली. दोन्ही परिवाराच्या सहमती त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.
ही घटना भभौली गावातील आहे. गावात राहणाऱ्या रामू बीनची मुलगी रिंकू कुमारीचं लग्न छपरा शहरातील राजेश कुमार याच्यासोबत जुळलं होतं. 2 मे रोजी त्यांचं लग्न होणार होतं. नवरदेव ठरल्यानुसार वरात घेऊन आला. पण पुढे जे झालं ते सगळ्यांना हैराण करणारं ठरलं.
2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. द्वारपूजेनंतर रिंकू आणि राजेश यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले.
पण यानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आला. नवरीची लहान बहीण पुतुल कुमारीने आपला होणारा भाओजी म्हणजे नवरदेवाला फोन केला आणि फोनवर धमकी दिली की, जर तू माझ्या बहिणीसोबत लग्न केलं तर ती छतावरून उडी मारून आपलं जीवन संपवेल. यानंतर घाबरलेल्या नवरदेवाने परिवाराला सगळं सत्य सांगितलं.
त्यानंतर लग्न मंडपात तणावाचं वातावरण तयार झालं. वाद इतका वाढला की, वरातीतील लोकांमध्ये आणि मुलीकडील लोकांमध्ये हाणामारीही झाली. गावातील लोकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही परिवारांना समजावून सांगितलं. त्यानंतर राजेशचं लग्न रिंकूसोबत नाही तर पुतुल कुमारीसोबत लावून देण्यात आलं.
असं सांगण्यात आलं की, पुतुल कुमारी आणि राजेश आधीच एकमेकांना ओळखत होते. राजेशचं लग्न पुतुल कुमारीची बहीण रिंकूसोबत ठरलं होतं. लग्न ठरल्यावर 2 मे रोजी लग्न होणार होतं. दुसरीकडे पुतुल कुमारी इंटरमीडिएटची परीक्षा छपरा येथील कॉलेजमध्ये देत होती. यादरम्यान पुतुल कुमारीची तिचा होणारा भाओजी राजेशसोबत सतत भेट होत होती.
नंतर दोघे फोनवरही तासंतास बोलत होते. ज्यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. पण पुतुल कुमारी राजेशला आपल्या बहिणीसोबत लग्न करताना पाहू शकली नाही. ऐनवेळी तिने राजेशला फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली. राजेश घाबरला आणि त्याने परिवाराला सगळं सत्य सांगितलं. दोन्ही परिवारांनी समजदारी दाखवत त्यांचं लग्न लावून दिलं.