मध्य प्रदेशच्या खरगोनपासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या महेश्वरमध्ये एका गायीचं आणि बैलाचं अनोखं लग्न लावण्यात आलं. महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त गावातील भरवाड समाज आणि मालधारी समजाच्या हजारो लोकांनी या लग्नाचं आयोजन केलं होतं.
या अनोख्या लग्नात गायीला नवरीसारखं आणि बैलाला नवरदेवासारखं सजवण्यात आलं होतं. सोबतच डीजे बॅंडवर नाचत हजारो लोक वरात घेऊन महेश्वरमध्ये नवरी बनलेल्या गायीच्या लग्नासाठी पोहोचले.
आयोजकांनी या लग्नाला शिव विवाह असं नाव दिलं. शिव विवाहात नवरी गौमाता नंदिनी आणि नवरदेव बनलेला नंदी नंदकिशोर आपली नवरी घेण्यासाठी पोहोचला. महेश्वरमध्ये नवरी बनलेली गाय नंदिनीचं वय आणि महाराष्ट्रातील दैवद गावातील नवरदेव नंदीचं वय 12 महिने आहे.
आयोजकांपैकी एक राणा भगत यांनी सांगितलं की, मला विचार आला की, गाय आणि बैलाचं लग्न लावलं जावं. जेव्हा गुजरातमधून महाराष्ट्रात आलो तेव्हा विचार केला की, महेश्वरमध्ये याचं आयोजन करू. जुन्या काळातही जे ऋषी महात्मा होते ते गाय आणि बैलाचा विवाह लावत होते. बैल आणि गायीच्या विवाहाला शिव विवाह म्हटलं जातं. महेश्वरमध्ये नर्मदा नदीच्या किनारी हा विवाह पार पडला. यात सगळ्याच समाजातील लोकांनी सहभाग घेतला होता. मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. पूर्ण रिती-रिवाजानुसार गाय आणि बैलाचा विवाह लावण्यात आला.