राजस्थानच्या जालौरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. वीज विभागाच्या एका लाइनमॅनच्या छातीत एक गोळी अडकली होती. पण त्याने मांजरीने पंजा मारल्याची जखम समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. साधारण ७ तासांनंतर त्याला समजलं की त्याच्या छातीत गोळी लागली आहे. तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. एक हैराण करणारी बाब म्हणजे ज्यावेळी हे सगळं झालं तेव्हा लाइनमॅनजवळ तीन इतर लाइनमॅन झोपले होते. ज्यांना गोळीबार झाल्याची कानोकान खबर नाही.
एका रिपोर्टनुसार, ही घटना जालौर जिल्ह्यातील रानीवाडाच्या कोटडा येथील आहे. इथे काही दिवसांपूर्वी ३५ वर्षीय लाइनमॅन नेमी चंद याला गोळी लागली होती. ही गोळी तब्बल १० तासांपर्यंत त्याच्या शरीरात अडकून होती. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ऑपरेशन करून ही गोळी काढण्यात आली. सकाळी ९ वाजता एका कर्मचाऱ्याला बंदुकीच्या गोळीचं केस सापडलं तेव्हा त्याला संशय झाला होता.
नेमीचंदने सांगितलं की, १२ वाजता फॉल्ट काढल्यानंतर जीएसएसवर बनलेल्या रूममध्ये तिघेही लाइनमॅन झोपले होते. रात्री २ वाजता मला जाणवलं की, काहीतरी गरम वस्तू माझ्या शरीरात घुसली आहे. आधी वाटलं की, मांजरीने पंजा मारला असेल, मग पाणी पिऊन मी पुन्हा झोपलो. पण सकाळी जेव्हा वेदना झाल्या तेव्हा एका डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेतलं. तेव्हा माझ्या सहकारी कर्मचाऱ्याने मला गोळीचं कव्हर दाखवलं. त्यानंतर मला गोळी लागल्याचा संशय आला.
त्यानंतर आम्ही पोलिसांना माहिती दिली. नंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला समजलं की, शरीरात एक गोळी आहे. गोळी काढणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, गोळी हार्टच्या खालच्या बाजूला लागली आहे. सुदैवाने ती हाडांच्या मधे अडकली. ज्यामुळे हार्ट आणि पोटाला नुकसान झालं नाही. त्याला जखम झाली आहे, मात्र जीव वाचला. सध्या पोलीस चौकशी करत आहे.