Viral News: अनेक देशांमध्ये आजही जुन्या काळातील भूमिगत बंकर आढळतात. आज यांचा वापर होत नसला, तरीदेखील काही गुन्हेगारी क्षेत्रातील लोक यांचा उपयोग चुकीच्या कामासाठी करतात. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. एका निर्जन ठिकाणी असलेल्या भूमिगत बंकरमध्ये 80 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा चोरीचा माल आणि बंदुका सापडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पोलिसांना हा बंकर सापडला आहे. एका दरोड्याच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस या परिसरात तपास करत होते. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी बंकर सापडला तो परिसर फ्रँकलिन मॅकनॅली शाळेच्या अगदी जवळ आहे. अशा परिस्थितीत एवढी शस्त्रे मिळाल्याने अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
सॅन जोस पोलिसांनी 13 जुलै रोजी या भूमिगत बंकरचे फोटो ट्विटरवर शेअर केले. या फोटोंमध्ये बॉक्समध्ये भरलेले सामान, बंकरकडे जाण्याचा मार्ग आणि बंदुका दिसत आहेत. याशिवाय बंकरचा लाकडी दरवाजा दिसतोय. बंकरच्या आत पंखा आणि लाईटचीही सोय आहे. सॅन जोस पोलिसांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, “पोलीस अधिकारी काल (12 जुलै) दरोड्याच्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी गेले होते. तपासादरम्यान, त्यांना कोयोट क्रीक आणि वूल क्रीक ड्राइव्ह भागात बंकर सापडले. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. मात्र, याप्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. जे काही लूट आहे, ती पीडितांना परत केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.