वॉशिंग्टन : १९६०च्या दशकात अमेरिकेमध्ये एका शर्यतीत अपघातग्रस्त झालेल्या व संपूर्ण जळालेल्या फेरारी गाडीचा सांगाडा लिलावात चक्क १५.६ कोटी रुपयांना विकला गेला. १९५४ फेरारी मोन्डियल स्पायडर सीरिज-१मधील ही गाडी आहे. या सीरिजमध्ये बनविण्यात आलेल्या १३ गाड्यांमध्ये या गाडीचा समावेश होता.
एका शर्यतीत या गाडीला अपघात झाल्यानंतर ती भस्मसात झाली होती. तिचा सांगाडा फ्लोरिडा येथील रिअल इस्टेट डेव्हलपर वॉल्टर मेडलिन यांनी १९७८मध्ये विकत घेतला होता. मेडलिन यांच्याकडे २० फेरारी गाड्या होत्या. त्यासोबत त्यांनी जळालेल्या फेरारीचा सांगाडाही जपून ठेवला होता. गेल्या वर्षी मेडलिन यांचे निधन झाल्यानंतर ही गोष्ट सर्वांना कळली. कॅलिफोर्निया येथे आर. एम. सद्बी कंपनीतर्फे झालेल्या लिलावात फेरारीचा सांगाडा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता.
या फेरारीने मोटारींच्या अनेक शर्यतीत भाग घेतला होता. तिचा सांगाडा लिलावात विकत घेणाऱ्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. सुमारे ७० वर्षे जुन्या असलेल्या फेरारीचा सांगाडा विकत घेणारा त्याचे पुढे काय करण्याची शक्यता आहे, या विषयावर अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे.