अहमदाबाद- गुजरातमधील एक 24 वर्षीय तरूण त्याचा 100 कोटींच्या व्यवसाय सोडून दीक्षा घेण्याच्या मार्गावर आहे. मोक्षेष शाह असं या तरूणाचं नाव असून तो चार्टर्ड अकाऊटंट आहे. मोक्षेफ 20 एप्रिल रोजी अहमदाबादमधील अमियापूरमध्ये दीक्षा घेणार आहे. मोक्षेप हा जवळपास 100 कोटींचा व्यावसाय सांभाळतो. पैशांनी काही विकत घेता येत नाही, मोक्ष सगळ्यात महत्त्वाचा आहे, असं मोक्षेषचं म्हणणं आहे. मोक्षेष शाह हा कोल्हापुरात असणाऱ्या एका अॅल्युमिनियम व्यावसायिक कुटुंबाशी संबंधीत आहे.
मोक्षेष शाह हा त्याच्या कुटुंबातील दीक्षा घेणारा पहिला व्यक्ती आहे. पैशांनी सगळं विकत घेता आलं असतं तर सगळे श्रीमंत लोक आनंदी असते. प्रत्येक गोष्ट मिळविल्याने मानसिक समाधान मिळत नाही. उलट काहीतरी राहिल्यासारखं वाटतं, असं मोक्षेषचं म्हणणं आहे.
सीए केल्यानंतर दोन वर्ष व्यावसाय केला पण मला आयुष्यातील पुण्य वाढवावं असं वाटलं. म्हणूनच मी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मी गेल्यावर्षीच दीक्षा घेणार होतो पण त्यासाठी माझे आई-वडील तयार नव्हते. पण आता त्यांनी मला दीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे, असंही मोक्षेषने सांगितलं. मोक्षाचा रस्ता सर्वश्रेष्ठ आहे. पण त्यासाठी जीवनात दुसऱ्यांची मदत करणं गरजेचं आहे, असा संदेश मोक्षेषने तरूणांना दिला आहे.