एखादी गोष्ट कधी देवदूत बनेल हे कोणालाच माहीत नाही. असंच काहीसं एका व्यक्तीच्या बाबतीत घडलं आहे. अलास्काच्या उंच डोंगरात तो एकटाच अडकला होता. या वेळी प्रचंड थंडी होती, हवामान खूपच खराब झाले होते. तो रस्ता चुकला. तिथून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. पण नंतर एक चमत्कार घडला. कोणताही मार्ग दिसत नसताना त्याचा कॅमेराच त्याच्यासाठी देवदूत झाला. याचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
गुड न्यूज मूव्हमेंट नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. कटमई नॅशनल पार्कमध्ये ही घटना घडली. लाइव्ह स्ट्रिमिंगसाठी या उद्यानात कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकले. पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, डोंगरात अस्वलांवर नजर ठेवण्यासाठी बसवलेल्या वेबकॅमचे आभार, या आठवड्यात कटमई नॅशनल पार्कमध्ये हरवलेल्या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे. तो बेपत्ता झाला तेव्हा सुमारे 6-8 लोक लाईव्ह स्ट्रीम पाहत होते आणि त्यांनी नॅशनल पार्क सर्व्हिसला याची माहिती दिली.
अचानक हवामान खराब झाल्यामुळे ही व्यक्ती हरवली होती. अमेरिकेच्या नॅशनल पार्कची बातमी देणार्या नॅशनल पार्क न्यूजने या संदर्भात सांगितले की, 'त्रस्त हायकरने डंपलिंग माउंटनवर कॅमेरा पाहिला आणि मदत मागण्यापूर्वी त्याचा अंगठा खालच्या दिशेने दाखवला. लाइव्ह स्ट्रीम पाहणाऱ्या लोकांनी नॅशनल पार्क सर्व्हिसला माहिती दिली. त्यानंतर त्याला परत आणण्यासाठी बचाव पथक पाठवण्यात आले. त्याला थंडी जाणवत होती. मात्र, कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. या व्हिडिओला 1.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
एका युजरने म्हटलं की, सोशल मीडियाबाबत ही एक चांगली गोष्ट आहे. तो ठीक आहे याचा आनंद आहे. दुसरा युजर म्हणाला, किती चांगली गोष्ट आहे. सर्वांचे आभार. या व्यक्तीने परिस्थिती हाताळली आणि आजूबाजूला उपलब्ध साधनांचा वापर केला. कल्पना करा की तुम्ही अस्वल पाहण्याच्या आशेने उद्यानाच्या लाइव्ह फीडमध्ये गेलात आणि एखाद्याचा जीव वाचवला असं देखील अनेकांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.