मुंबई : लग्न ठरल्यावर मुली रुखवतासाठी विशेष तयारी करतात, वस्तूंची खरेदी केली जाते. पण, अकोल्यातील अंदुरा गावात राहणाऱ्या चैताली गाळखेने रुखवतात शौचालयाची मागणी केली. इतर सर्व गोष्टींपेक्षा स्वच्छता महत्त्वाची आहे, याचे भान राखून चैतालीने केलेल्या मागणीचे सुलभ इंटरनॅशनलने स्वागत केले आहे. तिला गौरवण्यासाठी त्यांनी तिला १० लाखांचे बक्षीस दिले आहे. त्याचप्रमाणे आता ती सुलभची ब्रँड अम्बेसिडरही होणार आहेचैतालीचे लग्न ठरल्यावर इतर मुलींप्रमाणे ती ही खूष होती. लग्न ठरल्यावर पाच दिवसांनंतर निला सासरी शौचालय नसल्याचे तिला समजले. यामुळे तिने वडिलांना मला रुखवतात शौचालय द्या, असे सांगितले. वडिलांनीही तिची मागणी पूर्ण केली. १५ मेला तिचा विवाह झाला. यावेळी रुखवताऐवजी प्री-फॅब्रिकेटेड शौचालय ठेवण्यात आले होते. चैतालीच्या सासरी हे शौचालय बसवण्यात आले. सासरी शौचालय नाही म्हणून शौचालयाची मागणी करणे ही चैतालीची बाब कौतुकास्पद आणि धाडसी आहे. ग्रामीण भागातील महिलेने स्वच्छतेसाठी शौचालयाची मागणी करणे हे अनेक महिलांसाठी सकारात्मक, प्रेरणादायी उदाहरण आहे, असे मत सुलभ इंटरनॅशनलचे बिंदेश्वर पाठक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापक प्रमाणात सुरु केलेले स्वच्छता भारत अभियान ग्रामीण भागात रुजताना दिसत आहे. या अभियानामुळे सामान्य जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होताना दिसत आहे. प्री-फॅब्रिकेटेड शौचालय संगीताला भेट म्हणून देण्यात आले आहे. या शौचालयात एक बेसिन आणि आरसा आहे. (प्रतिनिधी)
चैतालीला मिळाला १० लाखांचा ‘अहेर’
By admin | Published: May 18, 2015 4:27 AM