ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - डिजिटल जगात तुमचा फोन म्हणजे तुमचं सर्वकाही असतं. खाणं, राहणं, फिरणं, खरेदी करणं असो किंवा अगदी अभ्यास करायचा असो फोनशिवाय काहीच करता येत नाही. फोनच्या बॅटरीमुळे तर अशी परिस्थिती आहे की पॉवर बॅंक नसेल तर मोठी अडचण होते. रेल्वे असो बसस्टॅंड असो की अगदी मेट्रो अर्ध्याहून जास्त जण तर फोन चार्ज करतानाच दिसतात.
त्यामुळे तुम्हाला जर, विना बॅटरीचा फोन येणार आहे ज्याला चार्जिंग करण्याची गरजच नाही असं कळलं तर आनंदला पारावार उरणार नाहीहे नक्की. विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या शोधकर्त्यांनी अशाच एका फोनची निर्मिती केली आहे. हा फोन बॅकस्केटर या टेक्नोलॉजीवर अवलंबून आहे. आजूबाजूचे रेडिओ सिग्नल आणि उपलब्ध असलेल्या प्रकाशाच्या सहाय्याने हा फोन चार्ज होईल असं सांगितलं जात आहे. हा एक बेसीक फीचर असलेला फोन असून त्यामध्ये कि-पॅडशिवाय एक छोटी एलईडी स्क्रीनसुद्धा असणार आहे.
सध्या या फोनचा केवळ प्रोटोटाइप तयार करण्यात आला आहे, पण येत्या काळात विना बॅटरीचे डिव्हाइस किंवा फोन बनवण्यात येणार आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या आधारे बेसीक ऐवजी स्मार्ट डिव्हाइस विकसीत करता येणं शक्य असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.