आपण नेहमीच बघतो, की लहान मुलांना कँडी खायला प्रचंड आवडते. एवढेच नाही, तर अनेक वेळा मोठे झाल्यानंतरही लोकांची कँडी खाण्याची सवय गेलेली नसते. जर, कँडी खाण्यासाठी लाखो रुपये मिळतील, असे आपल्याला कुणी सांगितले तर काय कराल? एवढी सुंदर नोकरी नाकारणारा क्वचितच कुणी असेल. कँडी तयार करणाऱ्या एका कंपनीने असाच एक जबरदस्त जॉब ऑफर केला आहे. कँडी लव्हर्स कँडी फनहाऊसने ऑफर केलेल्या या जॉबची संधी क्वचितच सोडतील. ही कंपनी चॉकलेट बारपासून ते लिकोराइसपर्यंत कन्फेक्शनरीची एक ऑनलाईन रिटेलर विक्रेता आहे.
टेस्टसाठी दर महिन्याला मिळणार लाखो रुपये -ही कॅनेडियन कंपनी चीफ कँडी ऑफिसर नियुक्त करण्याचा विचार करत आहे. यासाठी कंपनी 100,000 कॅनेडियन डॉलर (61.14 लाख रुपये) पगार देणार आहे. एवढेच नाही, तर हे काम आपल्याला आपल्या घरी बसल्याबसल्या करायचे आहे. म्हणजेच कंपनी आपल्याला वर्क फ्रॉम होमची सुविधाही देत आहे. अर्थात, घरबसल्याच आपल्याला कँडी टेस्ट करायची आहे आणि या बदल्यात आपल्याला लाखो रुपये मिळणार आहेत. जुलै महिन्यात लिंक्डइनवर पोस्ट करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की ड्यूटीमध्ये मुख्य कँडी बोर्डाची बैठक, मुख्य स्वाद परीक्षक आणि अशाच काही कामांचा समावेश आहे. याशिवाय, आई-वडिलांच्या परवानगीसह पाच वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांसाठीही ही जागा रिक्त आहे.
एका दिवसात टेस्ट कराव्या लागतील एवढ्या कँडी -यासंदर्भात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जमील हेजाजी म्हणाले, की त्याच्याकडे काही अनपेक्षित अर्जही आले आहेत. यात वेतन आणि कामे शेअर करणाऱ्या अनेक इच्छुक कुटुंबांचे व्हिडिओही आले आहेत. माध्यमांशी बोलताना जमील म्हणाले, सोशल मीडियाने दावा केला आहे, की एका मुख्य कँडी अधिकाऱ्याला दर महिन्याला कँडीचे 3,500 तुकडे खावे लागणार आहेत. हे चूक आहे. एका दिवसात केवळ 117 तुकडेच टेस्ट करावे लागणार आहेत. हे खूप सारे आहेत.
सोशल मीडियावरही होतेय चर्चा - नोकरीच्या या ऑफरमुळे सोशल मीडियावरही जबरदस्त चर्चा सुरू आहे. वृद्धांबरोबरच, मुलांनीही या पोस्टसाठी अर्ज केला आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज करतानाचे व्हिडिओ तयार केले आहेत आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर टोरंटो येथील या कंपनीचे जवळपास 340, 000 आणि टिकटॉकवर तीन मिलियन फॉलोअर्स आहेत, यात एका कार्दशियनचाही समावेश आहे.