ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६- महाराष्ट्रात मोदींची लोकप्रियता दिवसेंदिवस घटत चालली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार लोकप्रियतेत नरेंद्र मोदी यांची आणि देवेंद्र फडणवीसांची प्रसिद्धी सारखीच असल्याची माहिती समोर येते आहे. मात्र यावर मोदींच्या प्रसिद्धीशी माझी तुलना करणं चुकीचं होईल, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुका आणि राज्याच्या निवडणुकांनंतर यामध्ये अंतर असतं, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रसिद्धी दिवसेंदिवस घटत चालली आहे. या उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जास्तीत जास्त प्रसिद्धीझोतात येत आहेत. नाशिकमधल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत ही माहिती उघड झाली आहे.
श्वेता शालिनींच्या मतानुसार भाजपच्या वॉररूममध्ये हा सर्वे ठेवण्यात आला. मोदींना पसंत करणा-या 25 टक्के लोकांना फडणवीसांचंही काम आवडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींना 2013-14मध्ये यावेळी मिळालेल्या प्रसिद्धीची तुलना करणारा हा सर्वे असल्याची माहिती आता पुढे येते आहे. त्यावेळी जवळपास 40 टक्के लोक मोदींच्या कामानं प्रभावित झाले होते. मात्र यंदा हाच आकडा 25 टक्क्यांवर आला आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंदा महाराष्ट्रात 25 टक्केच पसंती मिळाली आहे. या सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्येच खळबळ माजली आहे. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी तर हा पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणत यावर बोलण्यास नकार दिला आहे..