Toilet timers in China: चीन हा अतिशय प्रगत देशांपैकी एक मानला जातो. पण त्यासोबतच चीनचे सत्ताधीश काहीसे आक्रमक पद्धतीने आपला देश चालवतात अशाही चर्चा अनेकदा कानावर येतात. आपल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या नवनवीन पद्धती अवलंबण्यासाठी चीन कुप्रसिद्ध आहे. आता या संदर्भात चीन सरकारने आणखी एक नवीन पाऊल उचलले असून त्यात पर्यटकांचाही समावेश आहे. चीनने चक्क कॉमन वॉशरूम आणि टॉयलेटच्या वर टायमर लावले आहेत. जेणेकरून लोक आत किती वेळ घालवत आहेत हे कळू शकेल. टॉयलेटच्या बाहेर टायमर लावल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ युनगांग बौद्ध ग्रोटोजच्या स्वच्छतागृहातील फोटो व्हायरल झाले आहेत.
चीनमधील युनगांग या ठिकाणी १५०० वर्षांपूर्वीच्या २५२ गुहा आणि ५१,००० मूर्ती आहेत. त्या पाहण्यासाठी २०२३ मध्ये ३० लाखांहून अधिक पर्यटक येथे आले होते. तेथे बांधलेल्या स्वच्छतागृहांमध्ये आता टायमर लावण्यात आले आहेत. तुम्ही टॉयलेटचा दरवाजा लावल्यानंतर तुम्ही किती वेळ टॉयलेटमध्ये आहात, हे प्रत्येक टॉयलेटबाहेरील डिजिटल टायमरने समजते. द सनच्या वृत्तानुसार, जेव्हा एखादे स्वच्छतागृह रिकामे असते, तेव्हा पिक्सेलेटेड एलईडी स्क्रीनवर 'रिकामे' असा शब्द हिरव्या रंगात दिसतो. जेव्हा कोणी शौचालयाच्या आत जाते, तेव्हा दरवाजा बंद होताच त्यावर वेळ सुरू होते आणि मिनिट व सेकंदांचा आकडा दिसू लागतो. दरवाजा उघडल्यावर कोणी किती वेळ शौचालयाचा वापर केला ते दिसते.
चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर टॉयलेटमधील टायमरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक युजर्सने यावर टीका केली आहे. तर अनेकांनी गंमतीत म्हटले आहे की यामुळे पर्यटकांना टॉयलेटमध्ये बसून फोन स्क्रोल करण्यापासून आळा बसेल.